मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत सुधारित वेळापत्रक सादर करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे अपात्र होतील आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरीही ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, त्यांना विधान परिषदेतून निवडून आणलं जाईल, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधानसभेची निवडणूक लढता येणार नाही. शिवाय ते विधानपरिषदेचे सदस्यही बनू शकणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती असीम सरोदे यांनी दिली.

हेही वाचा- शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

असीम सरोदे यांनी फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस हे वकिली शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत. अत्यंत निष्णात संविधानतज्ज्ञ श्रीहरी अणे यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी वकील म्हणून काही काळ काम केले आहे. तरीही आज ते असंवैधानिक गोष्टी करण्यात नेहमी पुढाकार घेताना दिसतात. देवेंद्र फडणवीस आता म्हणतायत की, एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तरीही त्यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून घेऊ व तेच मुख्यमंत्री पदावर राहतील. त्यांनी मनात आणले तर ही पुढची घटनाबाह्यता ते आणू शकतात.”

हेही वाचा- “अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

“पण हे सांगायला पाहिजे की संविधानाच्या कलम १०२/२ व १९१/२ मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, जर संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीतच शिवाय ते विधानपरिषदेचे सदस्यही बनू शकणार नाहीत. वकिलांनी आणि वकिली व्यावसायातील लोकांनी आपल्याला पाहिजे तसाच कायदा सांगावा, न्यायव्यस्थेतील लोकांनी यांना पाहिजे तसेच कायद्याचे अर्थ काढावे, हा दबाव आणण्यात याच प्रवृत्तीने गढूळपणा आणला आहे,” असंही असीम सरोदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After disqualification eknath shinde cant become member of vidhan parishadasim sarode reaction rmm