राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळणार असून, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेना(ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मनं दुखावली, की महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात राज्यपाल कसा नसावा, याचं उदाहरण म्हणून लोक जर कुणाचं नाव सांगतील तर ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं.” असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली बदली

याचबरोबर, “इडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची जरा जरी चाड असती, तर असा राज्यपाल केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावा. याचं विनंती पत्र त्यांनी तत्काळ लिहिलं असतं. जेव्हा ते महापुरुषांबद्दल वारंवार ठरवून खोडसाळपणे गरळ ओकत होते. परंतु आता राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्याची जी इडी सरकारने केलेली खेळी किंवा जो मानभावी पणा आहे ही सरळसरळ निवडणुकीच्या तोंडावरची खेळी आहे. लोकांच्या ज्या दुखावलेल्या अस्मिता आहेत त्याला मलमपट्टी लावण्याचा अत्यंत थातुरमातूर प्रकार हा राजीनामा मंजूर करून केला आहे. पण यामुळे कोश्यारींनी एकूण केलेल्या वक्तव्यांनी झालेली महाराष्ट्राच्या अस्मितेची हेळसांड भर निघणार नाही.” असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

याशिवाय, “जर खरोखरच त्यांना आपण केलेल्या चुकीची जाणीव असती, तर किमान एकदा तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती, माफी मागितली असती.” असं म्हणत अंधारे यांनी टीका केली आहे.