सांगली : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल असा संदेश महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी समाज माध्यमातून दिला आहे. लोकसभा निवडणुकीत ६० हजार ८६० मते मिळाल्यानंतर अनामत रक्कमही जप्त झाली. तीन मोठ्या पक्षांची महाविकास आघाडी असताना बूथ लावण्यास कार्यकर्तेही काही ठिकाणी मिळाले नाहीत. यामुळे गेले दोन दिवस कुणाशीही त्यांनी संपर्क साधला नाही. मात्र, समाज माध्यमावर संदेश पाठवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदेशात पहिलवान पाटील म्हणतात, या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले, पण माझ्यासारख्या शेतकर्‍याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. पण प्रत्येकाची वेळ येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल. या संदेशात रोख कुणावर यावर सध्या चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – “शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्तच असतो”, जयंत पाटील यांचं वक्तव्य

हेही वाचा – अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत का? सुनील तटकरे म्हणाले, “आमचे सर्व आमदार…”

दरम्यान, निवडणुकीतील पराभवाबाबत उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जे झाले ते सर्वांनीच पाहिले आहे. आम्ही आमच्या उमेदवाराबाबत मतदारांच्यात विश्‍वास निर्माण करण्यात कमी पडलो. या निवडणुकीत ज्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी गद्दारी केली, त्यांची पदे काढून घेण्यात येतील, नव्यांना संधी देऊन पुन्हा पक्ष बांधणी जोमाने करू. येत्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद उभी करत असताना उमेदवाराबद्दल विश्‍वास निर्माण करू. आमच्या काही उणिवा होत्या हे लक्षात आले असून त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After losing the kolhapur lok sabha elections chandrahar patil expressed his feelings on social media ssb
Show comments