कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने धडाकेबाज यश मिळवल्यानंतर आता मंत्रिपदाबरोबरीने पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांमध्ये जोरदार चुरस दिसत आहे. त्यासाठी सभागृहातील ज्येष्ठत्व, कर्तृत्व, अनुभव याच्या बरोबरीने जातीत – धार्मिक निकष जोडले जात आहेत. मावळते पालकमंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचवेळी मुश्रीफ – कोरे यांच्यात पालकमंत्री पदाची स्पर्धा दिसत असून त्यासाठी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे आर्जव सुरू झाले आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्व दहा जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला खातेही खोलता आले नाही. या निकालाचा जिल्हाभर जल्लोष करण्यात आला. उसंत मिळाल्यावर आता कार्यकर्त्यांना राज्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी राहणार याची उत्सुकता लागली आहे. तर आमदारांनी तशा हालचाली आरंभल्या आहेत.
हेही वाचा…वारणानगरला शनिवारपासून विभागीय साहित्य संमलेन
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात तुलनेने कमी जागा स्थान मिळण्याची शक्यता असली तरी मुस्लिम समाज, अल्पसंख्याक हे घटक गृहीत धरून मावळते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची वर्णी लागू शकते. नवाब मलिक पराभूत झाल्याने मुश्रीफ यांच्या आशा वाढीस लागल्या आहेत. आमदार विनय कोरे यांना ज्येष्ठत्वाच्या आधारे तसेच लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व म्हणून मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळी वाट चोखाळल्यानंतर त्यांना कोल्हापुरातून सर्वप्रथम राजेश क्षीरसागर यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे २०१४ मध्ये हुकलेली मंत्रिपदाची संधी त्यांना मिळेल अशी शक्यता अधिक आहे. एकनाथ शिंदे हे राधानगरीत आले तेव्हा प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद देऊ असा शब्द दिला असल्याने त्यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. सध्या भाजपमध्ये महाडिक यांचा प्रभाव जाणवत आहे. दुसऱ्यांदा जिंकलेले अमल महाडिक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…ऊसदरप्रश्नी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी संयुक्त बैठक
तिसऱ्या पिढीलाही संधी?
पहिल्यांदा निवडून आल्यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे या पितापुत्रांना राज्य मंत्रिपद मिळालेले होते. त्यामुळे त्यांच्या तिसऱ्या पिढीतील राहुल आवाडे यांना असेच मंत्रिपद मिळेल अशा अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळकीचे संबंध असल्याने शिवाजी पाटील यांच्या समर्थकांनाही त्यांची वर्णी लागेल असे वाटत आहे.
पालकमंत्रिपदाची स्पर्धा
हसन मुश्रीफ, विनय कोरे यांचे समर्थक पालकमंत्रिपदही आमच्याच नेत्याला मिळणार असे सांगत आहेत. राजेश क्षीरसागर यांचाही पालकमंत्री पदावर दावा आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथरूड येथून निवडून आलेले चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा कोल्हापूरचे पालकमंत्री होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.