काँग्रेसमधील युवा नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. आता काँग्रेसमधील आणखी एक नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात जाणार असल्याची शक्यता असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा सिद्दीकी आणि त्यांचा आमदार मुलगा झीशान यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याचं इंडया टुडेने म्हटलं आहे. त्यामुळे तेही लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील आमदार राहिले आहेत. तसंच ते अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून पराभव झाला होता. तर, मे २०१७ मध्ये ईडीने कथित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळासंदर्भात बाबा सिद्दीकी यांच्या घरावर धाड पडली होती. तेव्हापासून ते ईडीच्या रडारवर आहेत.

मुस्लिम चेहऱ्यासाठी बाबा सिद्दीकींना घेणार पक्षात?

नवाब मलिक यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. तसंच, ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर असलेल्या देशद्रोह्याच्या आरोपावरून त्यांना अजित पवार गटात घेण्यास भाजपाने विरोध केला होता. त्यामुळे मुस्लिम चेहऱ्याकरता बाबा सिद्दीकी यांना अजित पवार गटात घेतलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत असाच दावा केला आहे.

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी यांचं मूळ नाव झियाउद्दीन सिद्दीकी असं असून ते मुंबई काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जातात. बाबा सिद्दीकी यांनी विद्यार्थी नेता म्हणून त्यांच्या राजकीय करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीक यांचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून पराभव झाला होता. तर, २०१९ मध्ये बाबा सिद्दीकी यांचा पूत्र झिशान सिद्दीकी या मतदारसंघातून निवडून आला.