काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. संबंधित व्हिडीओ हा नेपाळमधील एका नाईट क्लबमधील असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. संबंधित व्हिडीओवरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पण राहुल गांधी हे नेपाळमध्ये मित्राच्या लग्नासाठी खासगी दौऱ्यावर गेले असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित पार्टीचा वाद ताजा असताना आता भाजपानं आणखी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित व्हिडीओमध्ये काँग्रेस पक्षाचे काही युवा कार्यकर्ते पार्टीत नृत्य करताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ युवा काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमातील असल्याचा दावा भाजपानं केला आहे. संबंधित व्हिडीओची पुष्टी ‘लोकसत्ता’कडून करण्यात आलेली नाही. हा व्हिडीओ भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘हे पार्टीचं ट्रेनिंग शिबीर होतं की, पार्टी करण्याचं शिबीर? महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या नवीन कार्यकर्त्यांचा हा व्हिडीओ बघा आणि गाणं ऐका! राहुल गांधी हे नेपाळच्या पबमध्ये आणि युवा नेते ट्रेनिंग शिबीरात पार्टी करत आहेत. देशात काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत वाईट असूनही काँग्रेसचे कार्यकर्ते पार्टी करण्यात दंग आहेत”, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

शेहजाद पूनावाला यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं की, राहुल गांधी अलीकडेच नेपाळमधील एका नाईट क्लबमध्ये पार्टी करताना आढळले होते. आता काँग्रेस पक्षाचे युवा नेते देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. जसा राजा तसे त्यांचे अनुयायी आहेत. सध्या राजस्थानातील जोधपूर येथे हिंसाचार सुरू आहे. महाराष्ट्र सरकार देखील एका पाठोपाठ विविध अडचणींचा सामना करत आहे, अशा स्थितीत काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते मात्र पार्टी करण्यात दंग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rahul gandhi pub row youth congress workers partying in training camp in nagpur maharashtra video shared by bjp rmm