नांदेड : माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा पक्षांतराचा बेत नक्की झाला आहे. दि. २३ मार्च रोजी (रविवारी) गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीची गुढी उभारून पाडवा साजरा करतील. नरसी (ता.नायगाव) येथे हा भव्य सोहळा होणार असून, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, मंत्री बाबासाहेब पाटील यांची यावेळी उपस्थिती असण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुका झाल्यापासून भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षांतराची चर्चा जोरात सुरु झाली. उभी हयात काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर २०१४ मध्ये वाऱ्याची दिशा ओळखून त्यांनी भाजपात प्रवेश केला. पण सन २०२३ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. २०२४च्या सुरुवातीलाच फेब्रुवारीमध्ये खा.अशोक चव्हाण भाजपमध्ये येताच खतगावकर सुद्धा त्यांच्याबरोबर दिसले. पण विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन सुनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खतगावकर यांची अस्वस्थता वाढत गेली. ते काँग्रेसला रामराम ठोकणार अशी कुजबुज सुरु झाली. परंतु त्यांचा नेमका इरादा काय, हे कळत नव्हते. कधी शिंदे यांची शिवसेना तर कधी अजित दादांची राष्ट्रवादी असे तळ्यातमळ्यात होते. २८ फेब्रुवारीला आ. चिखलीकरांनी नांदेडमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला होता. त्याचवेळी दादांचेही नाव घेतले जात होते. परंतु तसे घडले नाही. त्यावेळी कांग्रेसचे माजी आ. मोहनराव हंबर्डे व इतरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दरम्यान दि. २८ राजी अजित दादा नांदेडचा कार्यक्रम आटोपून परभणीला गेले व परतीच्या प्रवासात नांदेड येथून जाताना त्यांनी रात्री खतगावकर यांच्या घरी भेट दिली. त्याचवेळी खतगावकरांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय पक्का झाला. आता आपल्या लौकिकेला साजेसा सोहळा आयोजित करून शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा दादांचा मानस आहे. त्या दृष्टिने तयारीला वेग आला असून, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा हे देखील खतगावकरांबरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येते. याशिवाय त्यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या देगलूर-बिलोलीसह नायगाव, मुखेड, धर्माबाद या भागातून अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

२३ मार्चचा मुहूर्त होळी व धुलीवंदनाची धामधूम संपल्यानंतर २३ मार्च रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजिततादा पवार यांनी वेळ दिला आहे. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व इतर नेतेही असतील. खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनलताई मंगळवारी मुंबईत होत्या. प्रत्यक्ष कार्यक्रमाची अंतिम रुपरेशा अद्याप ठरलेली नाही. परंतु, अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करून खतगावकर हा सोहळा अविस्मरणिय ठरवतील असे दिसते.