राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खासकरून राष्ट्रवादीतील आमदार या पावसाळी अधिवेशनात किती आक्रमक होतात याकडे अवघ्य राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच आज राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी पवारांची भेट का घेतली याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
“आज आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित दादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री महोदय यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. शरद पवार बैठकीसाठी येथे आले असल्याचं आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीकरता आलो. ही संधी साधून आम्ही त्यांची भेट घेतली”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
हेही वाचा >> मोठी बातमी! राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटील म्हणाले, “मला फोन आला…”
पक्ष एकसंघ राहण्याकरता…
“पवारांचे पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा. आणि येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावं अशी आम्ही विनंती केली आहे. पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं जे मत होतं, विनंती होती ते ऐकून घेतलं. आणि भेटीनंतर आता इथून जात आहोत. उद्यापासून राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वामध्ये आपपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.