व्यवस्थेवरचा राग व हिंसेच्या आकर्षणापोटी नक्षलवादी चळवळीशी जुळलेले शहरी भागातील तरुण पोलीस कारवाईच्या कचाटय़ातून सुटल्यानंतर थेट जंगलाचा रस्ता धरत असल्याने पोलिसही चिंतेत पडले आहेत. कायदेशीर कारवाई करून आपण नक्षलवाद्यांचे संख्याबळ तर वाढवत नाही ना असा शंकेचा सूर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आळवला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी शहरी भागातील युवकांना वेगवेगळय़ा संघटनांच्या माध्यमातून चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या चळवळीशी संबंध ठेवून असणारे अनेक कार्यकर्ते शहरी भागात राहून हे काम करीत आहेत. समर्थक संघटनांच्या माध्यमातून तरुणांना जाळय़ात ओढणाऱ्या या कार्यकर्त्यांवर तसेच तरूणांवर अनेकदा पोलिसांनी कारवाई केलेली आहे. कारवाईनंतर हे कार्यकर्ते भूमिगत होतात पण, पोलिसांच्या कचाटय़ात सापडलेल्या तरूणांचे नेमके काय होते, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक तरुण नंतर थेट चळवळीत सक्रिय होण्यासाठी जंगलाचा रस्ता धरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून असण्याचा आरोप असलेल्या अरूण भेलके या तरुणाने २००५ मध्ये येथे देशभक्ती युवा मंचची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून शेकडो महाविद्यलयीन तरुणांना जोडण्यात आले. २००८ मध्ये पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून या संघटनेत सक्रिय असलेल्या तरुणांना शस्त्रासकट अटक केली. तेव्हा हे प्रकरण राज्यभर गाजले होते. तेव्हा पोलीस कारवाईच्या कचाटय़ात सापडलेले अनेक तरूण जामीनावर सुटका होताच बेपत्ता झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे तरुण थेट जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सामील झाल्याची माहिती आता गुप्तचर सूत्रांनी गोळा केली आहे. त्यावेळी कारवाई झालेले अरूण भेलके व कांचन नन्नावरे हे दाम्पत्य सध्या बेपत्ता आहेत. न्यायालयाच्या तारखेवर सुद्धा हे दोघे हजर राहात नाहीत. हे दोघेही छत्तीसगडमधील बस्तर भागात सक्रिय असल्याची पोलिसांची माहिती आहे. विशेष म्हणजे हे दोघेही उच्च शिक्षित आहेत.  २००८ मध्ये पोलिसांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेल्या मनोज सोनुलेला शस्त्रासकट अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर हा तरूण सुद्धा बेपत्ता झाला असून तो दलमचे काम करीत असल्याची पोलिसांची माहिती आहे. तेव्हा पोलिसांनी गोपाल मेश्राम व महेंद्र वनकर यांनाही अटक केली होती. हे दोघेही बेपत्ता आहेत. देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून नक्षलवाद्यांसाठी काम करणारे मारोती कुरवटकर, लोचन पाटील, प्रमोद गोडघाटे, सचिन चुदरी हे तरूण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बाहेर आल्यानंतर हे तरुण सुद्धा थेट चळवळीत सामील होतील, अशी भीती आता पोलीस व्यक्त करत आहेत.  पोलीस कारवाईच्या जाचानंतर शक्ती गडमलवार, रमण पुणेकर, रवींद्र कुरवटकर, सिराज मेश्राम हे तरुण जामिनावर सुटल्यानंतर मात्र जंगलात गेलेले नाहीत. म्
यापैकी सिराज मेश्रामला पणन महासंघात नोकरी लागली आहे आणि त्याने चळवळीशी संबंध तोडून टाकले आहेत, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांकडे आहे. गडमलवार व पुणेकर याच जिल्हय़ात राहून लहान-मोठी कामे करतात. हा सर्व घटनाक्रम केवळ कायदेशीर कारवाईचे अधिकार असलेल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा अस्वस्थ करणारा आहे. २००८ मध्ये कारवाई करणे भाग होते. मात्र नंतर हेच तरूण थेट चळवळीत सामील होतील असे वाटले नव्हते, असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले. कारवाईतून सुटका झाली तरी या तरूणांच्या मनात चळवळीविषयी असलेले प्रेम कमी झाले नाही. ते कमी करणारी यंत्रणा पोलिसांजवळ नाही. त्यामुळे कारवाई करून नाईलाजाने चळवळीचे संख्याबळ वाढते, अशी खंत या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

Story img Loader