लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा शरद पवार यांचा निर्णय कायम असल्यामुळे पक्षात गोंधळाची स्थिती असतानाच पवार हे आपल्या नातवासह येत्या रविवारी, ७ मे रोजी सोलापुरात येत आहेत. सांगोला येथे आयोजित पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार सोहळा, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात बायो-सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि सोलापुरात माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी पवार येत आहेत.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयावर शरद पवार हे ठाम आहेत. हा निर्णय बदलावा म्हणून राज्यभरातून पक्षाचे बहुतांशी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दबाव आणला तरी पवार हे भूमिका बदलायला तयार नाहीत. याच पार्श्वभूमीवर पक्षात राजकारण ढवळून निघत असतानाच येत्या रविवारी ७ मे रोजी आपले नातू तथा कर्जतचे आमदार रोहित पवार यांना सोबत घेऊन सोलापूर जिल्ह्यात येत आहेत.

आणखी वाचा- “राष्ट्रवादीचा वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता, पण…”, शिंदे गटातील आमदाराचं विधान

पंढरपूरच्या ५० वर्षांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी शरद पवार यांचे नाते कायम आहे. या कारखान्याचे संस्थापक औदंबर पाटील यांच्यापासून ते दिवंगत माजी आमदार भारत भालके यांच्यापर्यंत कारखान्याची धुरा वाहिलेल्या सर्व नेत्यांशी पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अभिजित पाटील यांनाही पवार यांनी जवळ केले आहे. या कारखान्याने बायो-सीएनजी उत्पादन प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी शरद पवार येत आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे नातू, कर्जतचे आमदार रोहित पवार हेही येणार आहेत. याशिवाय शेजारच्या धाराशिवचे उध्दव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे व इतर मंडळीही उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा- शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला नाही तर? अनिल देशमुख म्हणाले, “आम्ही सर्वजण…”

पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोला येथे सत्कार सोहळा होत असून त्यावेळी पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. सायंकाळी सोलापुरात राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या घरातील विवाह सोहळ्यासही पवार यांची उपस्थिती राहणार आहे.