चिपळूण: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याची विघ्ने संपता संपेनाशी झाली आहेत. जगबुडी नदी वरील पुलाला पडलेल्या भगदाडा नंतर आता बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचे काँक्रीट निघून लोखंड बाहेर आल्याने पुलाला भगदाड पडण्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत माजी सभापती शौकत मुकादम यांनी तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून धारेवर धरले.
गेल्या सात वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या कामात सातत्याने अडचणी येत असून अनेक दुर्घटना देखील घडल्या आहेत. यामध्ये गेल्या सुमारे नऊ महिन्यांपूर्वी बहादूरशेखनाका येथील पुलावरील गर्डरसह क्रेन कोसळण्याची घटना घडली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली. या महिन्यात शहरातील हॉटेल वैभव समोर पियर कॅप काढण्याचे काम सुरू असताना पिलरवरून तीन कामगार जमिनीवर कोसळून जखमी होण्याची घटना घडली. सावर्डे-वहाळ फाट्यावरील पुलाच्या जोड रस्त्याची काँक्रीट असल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या घटना समोर येत असताना चिपळूणमधील बहादूरशेख नाका पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचे काँक्रीट निघून लोखंड बाहेर आले आहे. हा सारा प्रकार माजी सभापती शौकत मुकादम यांनी उघडकीस आणून राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे धारेवर धरले. दरम्यान भर पावसात पुन्हा एकदा परशुराम घाटात कॉक्रिट रस्त्याला तडे गेले आहे. यापुर्वीही येथे रस्त्याला तडे जाण्याचा प्रकार घडला होता. तडे गेल्याने घाटातील एका मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकारामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरण कामाच्या निकृष्ट दर्जाचे नमुने समोर येत आहेत.
हेही वाचा >>>महाबळेश्वर येथे पावसाने ओलंडली शंभरी; दाट धुके आणि वर्षा पर्यटनाची पर्यटकांना भुरळ
बहादूरशेखनाका पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचे काँक्रीट निघून लोखंड बाहेर आले आहे. वेल्डिंग करून काँक्रीटने एक्सपान्शन जॉइंट सिमेंट काँक्रीटने बुजवले जाईल. या कालावधीत पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याचे राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण यांनी सांगितले आहे. तसेच परशुराम घाटात गडे गेलेल्या ठिकाण नव्याने कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सध्याच्या स्थितीला घाटात एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्याचे पंकज गोसावी, सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग महाड यांनी सांगितले आहे.