भाजपा खासदार गिरीश बापट यांचं काही वेळापूर्वीच पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झालं.त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. काही वेळापूर्वीच त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे. भाजपातले एक मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांचा पुण्यातला जनसंपर्क हा प्रचंड मोठा होता. सर्व पक्षीय नेत्यांशी गिरीश चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने आता भाजपातला पुण्यातला मोठा आधार गेला आहे असं म्हटलं तरीही काहीही वावगं ठरणार नाही. भाजपात त्यांनी नगरसेवक ते खासदार अशी पदं सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनीही व्यक्त केल्या भावना
माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?
गिरीश बापट यांची प्रकृती काही महिन्यांपासून ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.