वडिलांचं निधन झाल्यानंतर आपण आपलं बस्तान बसवण्यासाठी काय केलं हे अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार यांनी सांगितलेला हा किस्सा चांगलाच चर्चेत आहे. बारामती या ठिकाणी अप्पासाहेब पवार उद्योग भवनाचं उद्घाटन हे अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपले सुरूवातीचे दिवस कसे होते यावर भाष्य केलं.
काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
“मी देखील दुधाच्या व्यवसायातून पुढे आलेला माणूस आहे. माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी डेअरी व्यवसायामुळेच माझं बस्तान बसलं होतं. माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से आहे जे आता लोकांना सांगितले तर खरेही वाटणार नाहीत. मात्र आता एक किस्सा सांगतो. त्या काळात मी एक गाय साडेसात हजारांना विकत होतो आणि एक एकर जमीन साडेसात हजार रूपये खर्चून विकत घेत होतो. मी हे त्या काळाबद्दल बोलतो आहे जेव्हा जमिनींचे दर कमी होते. ” असंही अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार पुढे म्हणाले की, “बारामतीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गायींसाठी पंखे वगैरे लावत असत. यातून त्यावेळी एक कळलं होतं की शेतीसाठी, पशूपालनासाठी कष्ट घेतले तर यश मिळतेच. आताच्या गायींना योग्य पोषण मिळत असल्यामुळे त्यांचं शेणही भरपूर प्रमाणात मिळतं. गायी -म्हशीदेखील चांगल्या सुदृढ आहेत. गायींच्या आहारावर या शेतकऱ्यांचा अभ्यास झाला आहे. दर १२ तासांनी गायीचं आणि म्हशीचं दूध काढलं जातं. त्यामुळे गायी-म्हशींचं आरोग्यही नीट राहतं.” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आत्ताचे शेतकरी चांगले अभ्यासू आहेत. मला काही शेतकऱ्यांनी क्लिप दाखवली गायी आणि म्हशी खूप सुदृढ आहेत. आपल्या गायींना-म्हशींना गाजर गवत खाऊ घातलं तर दुधाला वास येतो. ते शेतकरी मला म्हणाले आम्ही दुपारचं दूध अडीच वाजता काढतो आणि सकाळचं दूध पहाटे अडीचला काढतो. निंबाळकर डेअरीची सात दशकांची वाटचाल आहे. अनेक लोक येऊन बारामतीत व्यवसाय करतात. निंबाळकर डेअरीच्या माध्यमातून दूध पदार्थांची विक्रीही केली जाते ही खूप चांगली बाब आहे. नुसती दुधाची उत्पादनं नाही तर इतर उत्पादनं, टॉमेटो सॉस हेदेखील त्यांनी विक्रीला ठेवलं आहे असंही अजितदादांनी यावेळी सांगितलं.