सांगली : माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे रविवारी सांगली, मिरजेसह ग्रामीण भागात पूजन करण्यात आले. अनेक घरामध्ये तांब्यासह जेष्ठा व कनिष्ठा गौरीचे मुखवटे सजवून नेत्रदीपक आरास करण्यात आली होती. या निमित्ताने महिलांनी हळदीकुंकू समारंभाचेही आयोजन केले होते. गौराईचे पारंपारिक लोकगीतामधून कोडकौतुक करण्यात महिला मग्न होत्या. गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौराईचे शनिवारी सोनपावलांनी घरोघरी आगमन झाले. ग्रामीण भागात पाणवठ्यावरून तर शहरी भागात अंगणातून मययाचे तुरे, गौरीची फुले, चाफ्याची पाने तांब्यामध्ये घालून स्वागत करण्यात आले.
घरी आलेल्या माहेरवासीन गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.आज सकाळीच जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे पूजन घरा-घरामध्ये करण्यात आले. सजविलेल्या गौरीच्या मुखवट्यांना नवीन साडी परिधान करून सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले होते. तसेच तिच्या समोर विविध फळे, शेतातील धान्य, फराळाचे पदार्थ ठेवून पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. कुळाचाराप्रमाणे काही घरामध्ये गौरीपूजनानंतर पारंपारिक लोकगीतांचा जागर महिलांनी केला. यावेळी शेजारी असलेल्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते.