सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने १० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातुलनेत त्यांनी ८० टक्के यशस्वी कामगिरी केली आहे. अशीच कामगिरी ते आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही करणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीला मिळालेला विजय पाहता आता आगामी विधानसभा निवडणुकीत ते अधिक उत्साहाने आणि नियोजनबद्ध काम करतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी टार्गेटही ठेवलं आहे. याबाबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जयंत पाटील म्हणाले, “आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा ८० टक्के स्ट्राईक रेट होता. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. १८० पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभेला आता साडे तीन महिने आहेत.”
हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची मुंबईत बैठक सुरू
सोडून गेलेले आमदार परतीच्या वाटेवर?
“सुप्रियाताई सुळे यांना बारामतीत ४८ हजारांचा लीड मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या वेगळ्या भावना आहेत. बरेचसे सोडून गेलेले नेते, आमदार, मंत्री म्हणत आहेत, आम्हाला परत पवार साहेबांसोबत काम करायचं आहे. मात्र, यासंदर्भात निर्णय झालेला नाही. जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतोय, असं दिसतंय”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >> संजय राऊत यांचा मोठा दावा! “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआ ‘इतक्या’ जागा जिंकणार”
राज्याच्या कारभाराला लोक कंटाळले
जबाबदारीतून मोकळं करा, अशी उद्विग्न मागणी देवेंद्र फडणवीसांनी पक्षनेतृत्त्वाकडे केली आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढलेत हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोकं त्यांचे भविष्य ठरवू शकतात. मात्र, महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे लोकं त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातली कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला लोक कंटाळली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देखील फडणवीस यांनी पूर्णपणे काम केलंय. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय आहे.”
हेही वाचा >> “पिपाणी चिन्हामुळे आम्हाला…”, जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “साताऱ्याची जागा…”
संजय राऊतांकडून १८५ चा दावा
“महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. विधानसभेला याहून मोठं यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल किर्तीकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला ते अनेक ठिकाणी झालं. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ” असं संजय राऊत म्हणाले.