शिवसेना आणि राष्ट्रवादीतून सत्ताधारी पक्षात सामिल झालेल्या गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार गटाला पुरेसा निधी मिळत नसल्याचा दावाही करण्यात येतोय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आमदारांवर टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले की, शिंदे आणि अजित पवार गटातील लोकांना लोकसभेपुरतंच वापरलं जाईल. त्यांचं महत्त्व न राहिल्यानंतर सोडून दिलं जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. सुरुवातीला नेत्यांना आणि सामान्य नागरिकांना आमिषे दाखवायची, परंतु जेव्हा प्रत्यक्षात आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा काही करायचं नाही.
अजित पवार आणि अमित शहा यांच्या दिल्ली भेटीबाबतही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिल्लीतील भेट सदिच्छा भेट असू शकते. किंवा ठरल्याप्रमाणे भाजपा काम करत नाही, यासह अनेक विषय असावेत. त्यामुळे १०० टक्के नाराजी आहे. फक्त नेत्यांमध्येच नाराजी नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. मला आणि लोकांना असं वाटतं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यातील (शिंदे-पवार गटातील) काही नेते थेट भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांचा तो दाखला खोटा
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी समुदायातील असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं एक जात प्रमाणपत्र कारणीभूत ठरलं आहे. हे जात प्रमाणपत्र शरद पवारांचं असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला असून त्यावरून शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शरद पवार गटाकडून या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, भाजपा असत्याच्या मार्गाने जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक कमेंटला ३ रुपये आणि प्रत्येक लाईकला १० पैसे दिले जातात. त्यांच्या सोशल मीडियाची टीम काही खोट्या गोष्टी पसरवत असते. हा दाखला स्प्रेड केला जातोय हा त्याचाच भाग आहे. सध्या जो दाखला व्हायरल होतोय त्यात कोणतंही सत्य नाही. अशा गोष्टी करणाऱ्या कार्यकर्ते आणि भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे.