Maharashtra Government on Maratha Aarakshan Live Today : मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मध्यरात्री तीन तास चर्चा करून मनोज जरांगे पाटलांनी सुचवलेल्या सुधारणा करून राजपत्र जारी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सुधारित राजपत्र मनोज जरांगे पाटलांना सुपूर्द केलं असून त्यांचं उपोषणही सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशीतील शिवाजी चौकात सभास्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटलांना विजयाचा गुलाल लावला. गुलाल लावल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी सरकारचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसंच, मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र आल्याने त्यांनी मराठा बांधवांचेही त्यांनी आभार मानले.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू होता. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या परिवारातील लोकांनाही तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावं. ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगेसोयऱ्यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी आपण येथे आलो होतो. साडेचार महिन्यांपासून आपण संघर्ष केला आहे. आपल्याला न्याय मिळावा आणि सगेसोयरेही आरक्षणात यावे याकरता अध्यादेश येणं गरजेचं होतं. माझ्या मायबाप मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला आहे. ३०० पेक्षा जास्त मराठ्यांच्या पोरांनी बलिदान दिलं आहे. माता-माऊलीच्या कपाळी कुंकू राहिलं नाही. घरातील कर्ता पुरूष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं.

हेही वाचा >> आंदोलन संपलंय की फक्त स्थगित केलं? मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही आत्ता…”

अर्ज करण्याचे आवाहन

“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं याकरता मुख्यमंत्र्यांनी शिबिरे सुरू केली. वंशावळी जुळवण्याकरता समिती स्थापन केली. नोंदी सापडलेल्या कुणबी प्रमाणपत्रधारकांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात येईल”, असं आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी केलं.

तुमचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही

“परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगेसोयरे”, असं म्हणत सगेसोयऱ्यांसाठी राजपत्रक काढल्यामुळे मनोज जरांगेंनी सरकारचे आभार मानले. “मराठ्यांची लेकरं रस्त्यावर झोपले, कधी अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही. पण एकानेही माझ्यापर्यंत तक्रार आणली नाही. प्रत्येक संघर्षाला तोंड दिलं. तुमची झालेली महाराष्ट्रातील एकी आणि तुमचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही”, असंही जरांगे पाटील म्हणाले.

गुलालाचा अपमान करू नका

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी एकच विनंती आहे की, तुम्ही अध्यादेश दिला. त्यासाठी गुलाल उधळला. पण या उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका”, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the maratha reservation ordinance was passed the victory meeting of the jarangs in vashi said insult to the gulal that was thrown today sgk
Show comments