मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतल्याचेही समोर आले आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ‘या’ प्रमुख १२ मुद्यांवर झाली चर्चा!
उदयनराजे म्हणाले, “ पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवायला हवं होतं. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार? म्हणजे राजकीय तडजोड, ठीक आहे आम्ही हे करतो पण असं असं.. आपण एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार, म्हणजे काय? देवाण-घेवाणच होणार ना? काहीतरी असंच होणार असं मला वाटतंय, हो की नाही?”
“ आता एवढं सगळं चाललंय प्रकरण संपूर्ण राज्यात कोणतरी कोणत्यातरी मजल्यावरून पडतं, कोणाच्या गाडीत काय सापडत आहे, कुठेतरी काहीतरी होतय म्हणजे कुठंतरी काहीतरी घडतंय हे सगळं सर्वांना माहिती आहे ना… मग त्यामध्ये भेटून काय होणार असतं, तर काय होणार तुम्ही आम्ही एकत्र येऊया आपलं लग्न परत लावूया आणि समाजाला शांत करूया. म्हणजे काय एकतर मुस्लिमांना पुरा आणि हिंदूंना जाळा एवढंच आता बाकी राहिलं आहे. एवढी आग या आरक्षणामुळे लोकांच्या मनात पेटलेली आहे. काय बोलणार?” असं उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखवलं.
सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर उदयनराजे भोसले यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांना उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
मोदी-ठाकरे भेट : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणीhttps://t.co/zxKh8GPYFQ < येथे वाचा सविस्तर वृत्त #CMUddhavThackeray #PMModi #Maharashtra @OfficeofUT @narendramodi @ShivSena pic.twitter.com/93UEHumtsh
— LoksattaLive (@LoksattaLive) June 8, 2021
पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
तर, मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.