वाद मिटवण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची शिष्टाई;  मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुखांची खोतकर भेट घेणार

जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टाई केली. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे सांगितले. परंतु दानवे आणि खोतकर यांनी मात्र बैठकीतील फलनिष्पत्तीबद्दल परस्परविरोधी विधाने केली.

पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्री देशमुख यांना बैठक घेण्यासाठी पाठवले होते. आमची चर्चा समाधानकारक झाली. त्यांच्या आणि आमच्या दोन्हीही बाजूंनी आता वाद शिल्लक नाही.

राज्यमंत्री खोतकर म्हणाले, आपण उद्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेणार आहोत. त्यानंतरच निवडणूक लढविण्याच्या संदर्भातील आपला निर्णय होईल. सोमवारी सहकारमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली असली तरी अद्याप मैदान सोडण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही. सोमवारी सकाळी बैठकीपूर्वी दोन वेळेस आपण बोललो. सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे अंदाज पाहिले तर आपण निवडून येऊ शकतो, असाच निष्कर्ष निघालेला आहे. आपले म्हणणे मी स्पष्टपणे देशमुख यांच्या कानावर घातले. उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आपल्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा आवश्यक आहे.

सहकारमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, दानवे आणि खोतकर यांच्या मनोमिलनामुळे आपण मनापासून आनंदी आहोत. मागील काळात या दोन्हीही नेत्यांनी आपापले पक्ष वाढविण्याचे प्रयत्न केले आणि त्यामधून संघर्ष निर्माण झाला. परंतु आता युतीची शक्ती वाढविण्यासाठी काम करावे लागणार आहे. खोतकर कडवे शिवसैनिक असल्याने ते कदापिही काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. त्यांच्या भावना आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निमंत्रण सहकारमंत्री देशमुख यांनी आपणास दिले. त्यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांचा आदेशच आपणासाठी अंतिम असेल. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तर काही हरकत नसावी, अशी आपली भूमिका आहे. सोमवारच्या बैठकीनंतर निवडणूक लढविण्याच्या संदर्भातील भूमिका आपण जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरच या संदर्भात बोलता येईल.

-अर्जुनराव खोतकर, राज्यमंत्री शिवसेना

Story img Loader