राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा मुंबईत केली. त्यानंतर पक्षातले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला आहे. हा निर्णय तुम्ही मागे घ्या अशी मागणी सगळ्यांनीच केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे तर थेट यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी संवाद साधला आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र या कार्यकर्त्यांनी त्यांचं काही एक ऐकून घेतलं नाही. अखेर सुप्रिया सुळेंनी तिथूनच शरद पवार यांना फोन केला. सुप्रिया सुळेंच्या फोनवरून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

“तुम्ही आत्ता सगळे तिथे बसला आहात. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही सगळ्यांनी जेवण करा. त्यानंतर मी तुमच्याशी बोलायला येईन. ” असं म्हटल्यावर कार्यकर्ते शांत झाले. त्यावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आम्ही हेच सांगायला तुम्हाला आलो होतो पण तुम्ही विश्वास ठेवला नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ऋणानुबंध या ठिकाणी जायला सांगितलं.

आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतं. त्यावेळी शरद पवार यांनी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी आपली कारकीर्द कशी होती त्याबाबत सांगितलं. तसंच या भाषणाच्या शेवटी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. तिथे जमलेल्या सगळ्याच नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हा धक्का होता. साधारण दुपारी १२.३० च्या दरम्यान शरद पवार यांनी ही घोषणा केली.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर दुपारी पावणेतीनपर्यंत शरद पवार यांना सगळेच जण आवाहन करत होते की तुम्ही हा तुमचा निर्णय मागे घ्या. मात्र शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. शरद पवार यांच्या जेवणाची वेळ ठरलेली असते ती टळून गेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांना इथून जाऊ द्या. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर शरद पवार हे कार्यक्रम स्थळावरून सिल्वर ओक या ठिकाणी गेले आहेत. मात्र कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. निर्णय मागे घेतल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही ही त्यांची भूमिका आहे. त्याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या मोबाईलवरून संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी “हमारा नेता कैसा हो शरद पवार जैसा हो” आणि “सारे देश की बुलंद आवाज शरद पवार शरद पवार” अशा घोषणाही दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the resignation sharad pawar communicated with the ncp workers through supriya sule phone what did he say scj
Show comments