कोल्हापूर : पाच राज्यांच्या निकालानंतर युती, आघाडी याबाबतच्या घटनांना वेग येईल. भाजप आणि शिवसेना या दोघांचेही लोकसभा आणि विधानसभा जागावाटप आताच निश्चित झाले पाहिजे असे मत आहे. याबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सारख्या भेटीगाठी सुरू आहेत. पण शिवसेना याबाबत १५ डिसेंबरनंतर भूमिका घेईल, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, दोन्ही पक्ष युती करण्याच्या मानसिकतेत असतात, तेव्हा विद्यमान जागा आपल्याला घ्याव्यात असा निष्कर्ष निघतो. तसे झाले तर लोकसभेच्या जागावाटपाचे काम सहा जागांसाठी असल्याने ते तुलनेने सोपे होईल. पण विधानसभेच्या जागावाटप ९५ जागांसाठी असल्याने त्यामध्ये अडचणी येऊ  शकतात. भाजप-शिवसेना युती करायचीच आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा कोणत्याही प्रकारे फायदा होऊ नये, अशी इच्छा असेल जागावाटप  समजुतीने होऊ  शकेल. शिवसेना पाच राज्यांमध्ये जो काही निकाल लागेल त्यावर निर्णय करेल.

.. तर ऊ स आंदोलकांवर कारवाई

साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही आपला ऊस शेतातून साखर गाळपासाठी गेला पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा, असे आवाहन पाटील यांनी केले. मात्र आंदोलनामध्ये कायदा हातात घेतला गेला तर प्रशासन गप्प बसणार नाही. कडक कारवाई करू, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातही शहरांचे नामांतर

उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात शहरांचे नामांतर केले जाणार आहे का, या प्रश्नावर पाटील म्हणाले, उस्मानाबाद आणि औरंगाबादची नावे बदलली पाहिजेत अशी सरकारची भूमिका आहे. परकीयांची चिन्हे लागली आहेत, ती पुसली पाहिजेत, असे माझे मत असून हा भाजपचा आग्रह असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज यांनी आधी महाराष्ट्र पाहावा

मनसेचे नेते राज ठाकरे व्यंगचित्रांच्या मालिकेद्वारे भाजप सरकारवर बोचकारे काढत असल्याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, त्यांना आधी माझ्यासोबत महाराष्ट्राचा दौरा करू देत. महाराष्ट्रात कोणतीच विकास कामे झाली नाहीत, असा दावा त्यांनी त्यानंतर करावा, असा टोला लगावून त्यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी सुद्धा मोठय़ा मनाने त्यांच्या भाषणामध्ये शासनाकडून झालेल्या कामांची स्तुती केली असल्याचे सांगत ‘बंधू’-भावाचाच संदर्भ दिला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the results of five states the decision over alliance with shiv sena says chandrakant patil