काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका व्हिडिओ कालपासून प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांचा कार्यकर्ता धुवत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओरून भाजपा आणि महायुतीतील इतर पक्षांनी तुफान टीका केली. या टीकेला आता नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली.

नाना पटोले उपहासात्मक म्हणाले, तरुण पिढीचं भविष्य बरबाद केलं जातंय, त्यावर लक्ष घाला. शेतकरी कर्जाच्या चिखलात फसलाय, त्यातून त्याला बाहेर आणा. इलेक्ट्रिक विभागाचा सावळा गोंधळही भयानक आहे. शेतकऱ्यांच्या शेतात वीज देत नाहीत. महाराष्ट्राने मोदींना नाकारलं आहे. त्यामुळे इथं मोदी मोदी करून काहीही अर्थ राहणार नाही. तुम्ही प्रिपेड मीटर लावत आहात. प्रीपेड मीटर नको म्हणून अनेकांनी अर्ज केले आहेत. अनेकांनी आंदोलनेही केली आहेत. तरीही तुम्ही ऐकायला तयार नाही. तुम्ही जनतेला चिखलात फसवत आहात. तुम्ही महाराष्ट्रात हे थांबवलं पाहिजे.

नाना पटोलेंच्या व्हिडिओवर अनेकांनी टीका करत ही सरंजामशाही आहे असं म्हटलं आहे. यावर नाना पटोले म्हणाले, “मी लोकांमधला आहे, यासाठी कोणत्याही प्रमाणपत्रांची गरज नाही. पैसे देऊन प्रचार करायची गरज नाही. कालची घटना मी लपवत नाहीय. कार्यकर्ता वरून पाणी ओतत होता. हरघर में नळ नाही ना. नाहीतर मी नळाचं पाणी घेतलं असतं.”

“मी शेतकरी आहे. मला चिखलाची सवय आहे. चिखल आहे म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेणार नाही असं नाही. मी राजा नाही. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> अकोला : कार्यकर्त्याने चक्क नाना पटोले यांचे पाय धुतले, नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

नेमकं काय घडलं होतं?

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी आले होते. नाना पटोले यांची लाडूतूला होती. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या लाडूतूला कार्यक्रमाचे आयोजनादरम्यान निराधार महिलांना साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. नियोजित कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

वाडेगाव येथे पाऊस पडला होता. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. पालखीच्या ठिकाणी सर्वत्र चिखल झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. या चिखलातून पायवाट काढत संत श्री गजानन महाराजांचे भाविक भक्त देखील मोठ्या संख्येने दर्शन घेत होते.

मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने माखले होते. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र, त्यांचे पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.