बदली झाल्यानंतर नव्या जागी दोन दिवसांत रुजू न झाल्यास वेतन रोखण्याच्या पोलीस महासंचालकांच्या इशाऱ्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.यामुळे बदलीस अनुत्सुक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
राज्यातील सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्याच्या अखेरीस झाल्या. तीन वर्षे सेवा झाली अशांना तात्काळ, तर ३० जूनला तीन वर्षे पूर्ण होतात, अशांना त्यानंतर कार्यमुक्त करण्याचा आदेश बदल्यांच्या आदेशातच नमूद आहे. मात्र, हा आदेश निघाल्यानंतर अनेक जण नव्या जागी रुजूच झाले नसल्याची बाब पोलीस महासंचालकांपासून लपून राहिली नाही. या पाश्र्वभूमीवर ‘बदली झालेल्यांना लगेचच कार्यमुक्त करा, दोन दिवसांत नव्या जागी रुजू न होणाऱ्यांचे वेतन जारी करू नका’, असे निर्देश पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी राज्य पोलीस दलातील सर्व विभाग प्रमुखांना दिल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी हादरले आहेत. बदली झाल्यानंतर विद्यमान व नव्या जागेतील अंतर पाहून साधारणत: सात ते पंधरा दिवस कालावधी दिला जातो. मात्र, महिना होऊनही अनेक जण नव्या जागी रुजू न झाल्याची बाब महासंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आली. आढावा घेतला असता अनेकांना कार्यमुक्तच केले गेले नसल्याचे स्पष्ट झाले.
सध्याच नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आदींची दहा पदे रिक्त आहेत. सर्वसाधारण बदल्या होण्यापूर्वीची ही स्थिती आहे. बारा पोलीस निरीक्षक, नऊ सहायक निरीक्षक व आठ उपनिरीक्षकांची नागपुरातून बदली झाली. नऊ निरीक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. तीन निरीक्षक, चार सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांना अद्याप कार्यमुक्तच करण्यात आलेले नाही. चौदा पोलीस निरीक्षक, दहा सहायक निरीक्षकांची नागपूर शहरात बदली झाली. त्यापैकी सहा पोलीस निरीक्षक, सात सहायक निरीक्षक अद्यापही नागपुरात रुजू झालेले नसल्याची माहिती आहे. विदर्भात साधारणत: अशीच परिस्थिती आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसतो. यामुळे प्रशासकीय समतोल बिघडत चालला असल्याचे मत जाणकार पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बदली झालेले येथे रुजू होत नाहीत तोपर्यंत नागपुरातून कार्यमुक्त करणे शक्य नाही, अशी नागपूरच्या पोलीस आयुक्तांची भूमिका आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांशी ते चर्चा करणार आहेत.
विदर्भासाठी नित्याचीच बाब
पश्चिम महाराष्ट्र सोडला तर राज्याच्या इतर भागांत विशेषत: विदर्भात बदली झाल्यास काम न करणाऱ्यांची इच्छा असलेले विदर्भात रुजू होत नाहीत. काही दिवसांनंतर ते विदर्भात झालेली बदली रद्द करवून घेतात अथवा पश्चिम महाराष्ट्रातच कुठेतरी बदली करवून घेतात. विदर्भातून बदली झालेल्यांना लगेचच कार्यमुक्त केले जाते. त्यांच्या जागी बदली झालेले न आल्याने अनेक पदे रिक्तच राहतात. ही आता नित्याचीच बाब झाली आहे.