सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी तुलना केल्याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र व दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेते उदयनिधी स्टॅलिन सध्या बरेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर, दुसरीकडे याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट केलं आहे.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?
शनिवारी उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं.
हेही वाचा >> “काही लोक बालिश…”, सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना केल्यानंतर स्टॅलिनपुत्र उदयनिधींचं स्पष्टीकरण!
प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट काय?
“सनातन धर्म अस्पृश्यता मानतं. आम्ही याचा स्वीकार कसा करायचा?” असं ट्वीट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. आता यावरूनही मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
उदयनिधींनी दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांच्या वाक्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी पुन्हा सांगतो. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली. सनातन धर्माचं उच्चाटन व्हायला हवं असं म्हणालो. मी ते पुन्हा म्हणेन. त्यांना माझ्याविरोधात जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, ते त्यांनी करावेत”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले आहेत. “भाजपा खोट्या बातम्या पसरवत आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीमुळे घाबरले असून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.