महाराष्ट्रातील तळेगाव येथील नियोजित ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरु असतानाच आता अन्य एका मोठ्या कंपनीने आपला तळ राज्याबाहेर हलवल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये छापलेल्या एका नोटीसच्या आधारे ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर ‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेल्याची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारलाही लक्ष्य केलं आहे.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर
रोहित यांनी काय म्हटलं आहे?
“‘फोनपे’ डेबिटेड फॉर्म महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक” या मथळ्याखाली रोहित पवार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. रोहित यांनी एका चारोळीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “‘वेदान्त’नंतर ‘फोनपे’ची बारी… गब्बर होतायेत शेजारी… महाराष्ट्र पडतोय आजारी… व्वा रे सत्ताधारी” अशी चारोळीही रोहित यांनी या नोटीसच्या फोटोसोबत पोस्ट केली आहे. तसेच महाराष्ट्र सर्वाधिक कर देणारं राज्य असूनही येथील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचं सांगताना, ” टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे… महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे” असं रोहित यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात वाद; PM मोदी म्हणाले, “हा करार…”
कंपनीच्या नोटीसमध्ये काय आहे?
‘फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, “कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे,” अशी माहिती दिली आहे.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणतात, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
तसेच, “कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते,” असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा >> ‘वेदान्त’च्या मालकांची पोस्ट शेअर करत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन लाख कोटी रुपयांची…”
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आता कर्नाटकला हलवण्यात येणार असल्याने यासंदर्भातील ही सूचना गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे.