पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. पुणे पोर्श कार अपघातानंतर पुण्यातील बार आणि पब लोकांच्या रोषाचा विषय ठरले होते. त्यानंतर आता अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पब संस्कृतीवर चहुबाजूंनी टीका होत आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून शहरातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

अमली पदार्थांशी संबंधित असेलल्या पबचे बेकायदेशीर बांधकाम बुलडोझरचा वापर करून पाडण्याचे आणि पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर बनविण्यासाठी नव्याने कारवाई सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अल्पवयीन मुले? ‘त्या’ तीन मुलांनी एका रात्रीत ८५ हजार रुपये उधळले

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याला अमलीपदार्थ मुक्त शहर बनविण्यासाठी अनधिकृत पबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थाशी निगडित असलेल्या पबवरील अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडावे, असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आले आहेत.”

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमधील प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मध्यरात्रीनंतर पब सुरू असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. पबमालकासह, चालक, व्यवस्थापकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

“भाजपा-शिंदे गटाच्या सरकारमुळे पुणे बदनाम होत आहे”; ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांचा…”

या घटनेनंतर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री पबमधील प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा शोध सुरु केला आहे. त्या तरुणांनी ८० ते ८५ हजार रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. पबमध्ये काही अल्पवयीन मुले असल्याची शक्यता आहे. त्या रात्री पबमध्ये असलेल्या ४० ते ४५ तरुणांची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.