हमास हल्ला आणि त्यानंतर झालेल्या युद्धामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची बुडणारी राजकीय नौका किनाऱ्याला लागली. परंतु, आता याच युद्धामुळे नेतान्याहू यांची राजकीय कारकिर्द संकटात सापडली आहे. राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि फुग्यामध्ये भरलेली हवा जनताच कधीतरी काढते, असा सूचक इशारा ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. ठाकरे गटाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादावर टीका करण्यात आली आहे.
“हजारो निष्पाप महिला आणि बालकांचा बळी घेऊनही युद्धपिपासू नेतान्याहू शांत झालेले नाहीत, अशा आरोपांची राळ नेतान्याहू यांच्याविरोधात उडविली जात आहे. आता हेच युद्ध त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी धोका ठरले आहे. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढते, याची दाहक जाणीव आता नेतान्याहू यांना झाली असेल”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा >> उत्तर कोरियाकडेही लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र! जगाच्या चिंतेत भर पडणार?
बेंजामिन नेतान्याहू यांचा उल्लेख करून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, “आपल्या देशातील मोदी राजवट म्हणजे तरी यापेक्षा वेगळी कुठे आहे? नेतान्याहू यांच्याप्रमाणेच त्यांचे परममित्र म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे. या फुग्यात कधी हिंदुत्वाची हवा भरली गेली तर कधी आर्थिक राष्ट्रवादाची. कधी ३७० कलमाची तर कधी अयोध्येतील राममंदिर निर्माणाची. कधी भोजशाळा वादंगाची तर कधी नागरिकता सुधारणा कायद्याची. पुलवामासारख्या दहशतवाद्यांनी केलेल्या सैनिकांच्या हत्याकांडाचादेखील त्यांनी राजकीय स्वार्थासाठी वापर केला.
“मोदी सरकारचे अपयश असूनही त्याला राष्ट्रवादाचा मुलामा दिला गेला. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्याचा वापर केला गेला. भ्रामक राष्ट्रवाद आणि धर्मवादाची हवा सत्तेच्या फुग्यात भरायची आणि तो फुगा हवेत सोडून सामान्य जनतेला झुलवीत ठेवायचे”, अशी टीकाही या माध्यमातून करण्यात आली.
तेथे काय घडतंय बघताय ना?
“मतलबी राष्ट्रवाद आणि त्याच्या जोरावर साधलेला राजकीय मतलब, या मोदी आणि नेतान्याहू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेतान्याहू यांनी हमास युद्धाच्या आड त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी फुगविलेला मतलबी राष्ट्रवादाचा फुगा तेथील जनतेने फोडला आहे. आपल्या देशात दहा वर्षांपासून निर्माण केलेला खोट्या राष्ट्रवादाचा भ्रमाचा भोपळादेखील जनता असाच फोडणार आहे. कारण मोदी राजवटीला देण्यात आलेली राष्ट्रवाद-धर्मवादाची कल्हई आता संपली आहे. जनताही त्या भ्रमातून बाहेर आली आहे. इस्त्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार आहेत. मि. मोदी, तुमचे परममित्र मि. नेतान्याहू यांच्याविरोधात तेथे काय घडतेय ते बघताय ना!”, असा सूचक इशारा देऊन ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.