केंद्रीय मंत्रिमंडळाच्यारूपात भाजपने अफझलखानाची फौज महाराष्ट्रात उतरवली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेला प्रत्येक जण आमचा शत्रू आहे. पण महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या या अफझलखानाच्या फौजेला मराठी माणूस कधीच थारा देणार नाही, अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते.
स्वराज्य निर्माण करण्यासाठी आई तुळजाभवानीने छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिले. तेच आशीर्वाद आता सेनेच्या पाठीशी आहेत. कदाचित युती तुटावी, अशी आई जगदंबेचीच इच्छा असावी. सेनेचा उपयोग करून केंद्रात सत्ता मिळविणाऱ्या भाजपने खुर्ची मिळताच सेनेला लाथाडले. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र आखणारी ही मंडळी विकासाचे गाजर दाखवून पुन्हा तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावध रहा, असेही ठाकरे यांनी सांगितले. तुळजापूर मतदारसंघावर भगवा फडकावणे म्हणजे विधानसभेवर भगवा फडकावणे होय. जगदंबेने तसे संकेत दिले आहेत. शिवरायांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. इथला मराठी माणूस कष्ट करणारा, घाम गाळणारा व प्रसंगी रक्त सांडणारा आहे. तो केवळ सेनेच्या पाठीमागेच आपले बळ उभे करतो. त्यामुळे या अफझलखानाच्या फौजेला आपण नक्की गाडू, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा नाही. त्यामुळे दिल्लीच्या तालावर शेपूट हलविणारा आणि ‘थांब’ म्हटल्यावर शेपूट दुमडणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का? असा सवाल करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक भाजप नेत्यांची खिल्ली उडवली. युतीसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे खूप मोठा दुवा होते. त्यामुळे युती तुटली तरीही मुंडे-महाजन परिवाराशी असलेले ऋणानुबंध तुटू देणार नाही. पंकजा व प्रीतम निवडून आल्याच पाहिजेत, असे आदेश आपण शिवसनिकांना दिले आहेत. मात्र, त्यानंतर उर्वरित बीडवर फक्त सेनेचाच भगवा फडकेल, असेही त्यांनी ठणकावले.
राष्ट्रवादी व काँग्रेसवर मी काहीच बोलणार नाही. कारण त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या संकटांचा आपण सर्वानी अनुभव घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले. सेनेच्या हातात सत्ता द्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्राचा विकास करून दाखवतो. पहिली ते दहावीचा नवीन अभ्यासक्रम आपल्याकडे तयार आहे. सेनेची सत्ता आल्यावर विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करून त्यांना टॅब्लेट देणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सभेत सेनेने भाजप व राष्ट्रवादीला लक्ष्य केले. तुळजापुरात प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या मधुकर चव्हाण यांच्याविरोधात राजेिनबाळकर यांनी चकार शब्दही काढला नाही. सभेला सेनेचे पदाधिकारी, कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
‘मी शिवसेनेचाच’ : खासदारांचा खुलासा!
जिल्ह्यात शिवसेना उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, खासदार रवींद्र गायकवाड जिल्ह्याबाहेर दौरे करीत आहेत. त्या अनुषंगाने स्वत: गायकवाड यांच्यावर ‘मी प्रचाराला जिल्ह्यात नसलो तरी बाळासाहेबांचा सनिक आहे,’ असा जाहीर सभेत खुलासा करण्याची वेळ आली. व्यासपीठावर उपस्थित सेनेचे उमेदवार सुधीर पाटील, ज्ञानराज चौगुले व ज्ञानेश्वर पाटील यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. सुधीर पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आमदार ओम राजेिनबाळकर यांनी सणात सत्यनारायण उरकून घेतला. व्यासपीठावर उद्धव ठाकरे येत आहेत. भाषण आवरते घ्या, असा तगादा राजेिनबाळकरांच्या मागे पाटील यांनी लावला. ओमराजे यांनी सभेला हजर शिवसनिकांनाच ‘थांबू का रे बाबांनो’, असे थेट विचारत आपले घोडे दामटून नेले.

Story img Loader