गणेश कारखाना चालवण्यास दिला, याच्या पश्चात्तापाची वेळ संचालक, सभासद व कामगारांवर कदापि येणार नाही. गणेश कारखान्याचा भविष्यकाळ गौरवशालीच असेल अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
श्री गणेश सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सहभागीदारी तत्त्वाने चालविण्यास घेतला. त्याचा हस्तांतरण सोहळा गुढीपाडव्याचे औचित्य साधून झाला. या सोहळय़ात विखे बोलत होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे, अ‍ॅड. नारायण कार्ले, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ आदी या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, गणेशच्या गतकाळात सत्ताधारी व आमच्यात जीवघेणा संघर्ष झाला. एकमेकांविरुद्ध निवडणुका लढविल्या, परंतु शेतकरी व कामगारांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेतली. गणेश कारखाना या परिसराची कामधेनू आहे. ती टिकली पाहिजे हा उदात्त हेतू डोळय़ांसमोर ठेवल्यानेच आजचा आनंदाचा क्षण आपण सर्व जण पाहात आहोत. सहकाराची कास धरून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. सहकार चळवळीशी फारकत कधी घेतली नाही. म्हणूनच गणेश सहकारी साखर कारखाना आपण सहभागीदारी तत्त्वाने चालवण्यास घेतला. करार संपल्यानंतर सतरा-आठरा वर्षांनी गणेश कारखान्याची मालकी गणेशच्या सभासदांचीच राहणार आहे. पुढील हंगामात गणेश कारखाना सुमारे साडेचार लाख टनाचे गाळप करील हे उद्दिष्ट ठेवून कारखान्यात बरेच बदल व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. आसवानी प्रकल्प बायोगॅसवर करून बाराही महिने चालवू, काटकसरीने जुने वैभव पुन्हा आणू असे विखे म्हणाले.
गणेश कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद आहे. आर्थिक संकटात सापडलेला हा कारखाना सुरू व्हावा, अशी इच्छा सभासदांसह ऊस उत्पादकांची आणि कामगारांचीही होती. राज्य सरकारने प्रस्तावास संमती दिल्यानंतर दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळात झालेल्या करारानुसार आता ‘प्रवरे’च्या सहकार्याने गणेश कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा