कडाक्याचे ऊन, असहय़ उकाडा, काही वेळाने आभाळ आणि नंतर लगेचच पाऊस. नगर शहरात आठ दिवसांनी बुधवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. राहात्यासह जिल्हय़ाच्या काही भागांतही चांगला भिजपाऊस झाला.
आठ दिवसांच्या अंतराने शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हाळय़ातील हा तिसरा-चौथा पाऊस आहे. मागच्या आठ-दहा दिवसांत उन्हाळय़ाची तीव्रता चांगलीच वाढली असतानाच बुधवारी अचानक नगर शहर व जिल्हय़ाच्या काही भागांत पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला. नगर शहर व परिसरात दुपारी तीननंतर वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्याने झोडपून काढले. तुलनेने पावसाला फारसा जोर नव्हता.
उन्हाळय़ास सुरुवात झाल्यापासून आठ-पंधरा दिवसांच्या अंतराने अवकाळी पावसाने सतत तडाखा दिला. आताही उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली होती. तापमान ४० अंशांच्या जवळपास गेले असताना पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा आला. मागच्या तीन-चार दिवसांत उन्हाने चांगलीच काहिली होऊ लागली होती. मंगळवारी रात्री तापमान कमालीचे उष्ण होते. दुपारनंतर रस्तेही सामसून होत. मंगळवारीही दुपारी दोन-अडीचपर्यंत उन्हाची तीव्रता टिपेला गेली होती. त्याने घामघाम होत असतानाच चारनंतर वातावरणात एकदम बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी होऊन दुपारी चार वाजताच झाकोळून आले. काही वेळातच वेगाने वाहणारे वारे सुरू होऊन पावसालाही सुरुवात झाली. बारीक पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

Story img Loader