पट्टेरी वाघाच्या कातडीचा व्यापार करणा-या टोळीकडून सोमवारी आणखी एक पूर्ण वाढ झालेल्या पट्टेरी वाघाचे कातडे पोलिसांनी हस्तगत केले. आंतरराष्ट्रीय बाजारात वाघाच्या अवयवांची विक्री करणारे रॅकेट यामागे असावे अशी शक्यता पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. या रॅकेटमधील सात जण सध्या पोलीस कोठडीत असून वाघांची शिकार करणारी टोळी मात्र अद्याप हाती लागलेली नाही.
वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याच जिल्ह्यात दुर्मिळ समजल्या जाणा-या पट्टेरी वाघाच्या कातडीचा व्यापार विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला. नकली ग्राहक पाठवून चांदणी चौकातील नेट कॅफेमध्ये विक्रम शेटके, अमित पाटील, संतोषकुमार िशदे या तिघांना अटक करून ९ लाखाचे वाघाचे कातडे गुरुवारी हस्तगत करण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या टोळीत सहभागी असणा-या बसवराज रजपूत, संजय दुधाळ व निखिल पाटील या तिघांना शुक्रवारी अटक केली. या टोळीचा सूत्रधार म्हणून ओळखला जाणारा महेबूब नबीसाब अत्तार (रा. राजीवनगर, सांगली) याला रविवारी रात्री अटक करून चौकशी केली असता त्याच्याकडे वाघाचे काही अवशेष असल्याचे पोलिसांना समजले.
सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक धनंजय भांगे, उपनिरीक्षक एकिशगे, नाईक संजय कांबळे, राजीव कोळी, गजानन गोसावी आदींच्या पथकाने महेबूब अत्तार याच्या घरावर छापा टाकला असता आणखी एक वाघाचे कातडे मिळून आले. हे कातडे पूर्ण वाढ झालेल्या पट्टेरी वाघाचे असून गोळीबाराच्या खुणा या कातडीवर स्पष्टपणे दिसून येतात. याची किंमत ९ लाख रुपये असली तरी चीनमध्ये वाघाच्या सर्वच अवयवांना मुँहमांगी किंमत मिळत असल्याचे अधीक्षक सावंत यांनी सांगितले.
दुर्मिळ पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी सांगलीत होत असल्याची माहिती मिळताच केंद्रीय वन्यजीव संरक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून वरिष्ठ अधिका-यांचे पथक सांगली पोलिसांच्या संपर्कात आहे. पट्टेरी वाघाची शिकार नेमकी कोठे झाली? यामागे कोणती टोळी सक्रिय आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांचे एक पथक अटकेत असणा-या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार परजिल्ह्यात शोधमोहिमेवर पाठविण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी काही वाघाचे कातडे मिळण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण तस्करीची व्याप्ती लक्षात घेऊन सदर घटनेचा तपास उपअधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा