कर्नाला पक्षी अभयारण्यापासून अवघ्या साडे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाचे द्विसदस्यीय पथक पुन्हा दौरा करणार आहे. गेल्या २० मार्चला नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठविला होता. या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
प्रस्तावावर बैठकीतील सदस्यांनी घमासान चर्चा केल्यानंतर प्रस्तावित विमानतळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. असद रहमाने आणि सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे यांची दोन सदस्यीय समिती दौऱ्यावर पाठविण्याच्या सूचना केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी दिल्या आहेत. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली असून त्यानंतर प्रस्तावित विमानतळाच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.  
रायगड जिल्ह्य़ातील पनवेल येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत असून यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची हिरवी झेंडी आवश्यक आहे. वर्तमान विमानतळापासून ३५ किलोमीटर अंतरावरील आणि मानखुर्द-बेलापूर पनवेल रेल्वे लाईन (खंडेश्वर) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या विमानतळापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्यंत नजीक आहे. तसेच सदर विमानतळ कर्नाळा पक्षी अभयारण्यापासून अवघे साडेनऊ किलोमीटर अंतरावर होणार असल्याने विमानांच्या येण्या-जाण्यावरून पक्ष्यांना धोका निर्माण होणार आहे. तसेच पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे विमानांनाही धोका पोहोचण्याची भीती वर्तविली जात आहे. राज्य सरकारने केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव निर्णयार्थ पाठविला होता. परंतु, पर्यावरणवाद्यांचा प्रस्तावित विमानतळाला तीव्र विरोध असल्याने त्यावर चर्चा होऊन संबंधित जागेचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचे ठरविण्यात आले. या घडामोडींना वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दुजोरा दिला आहे. जागेच्या सर्वेक्षणासंदर्भातील पर्यावरण व वने मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.