आगरी समाज हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक असून, या समाजाने महाराष्ट्राच्या संरक्षणात बहुमोल योगदान दिले आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. खांदेश्वर (रायगड) येथे आयोजित सातव्या आगरी समाज महाअधिवेशन समारोपाप्रसंगी ना. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. बा. पाटील हे होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक समाजांचे लोक होते. यामध्ये आगरी समाजाचाही समावेश होता. आगर पिकविणारा समाज आगरी असून, ठाणे रायगडमध्ये हा समाज मोठय़ा संख्येने आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ग. ल. पाटील, ना. ना. पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. भारताचा वेगाने विकास होत आहे, त्यात भारतात नव्या आगरी पिढीला स्थान मिळाले पाहिजे. औद्योगिकीकरण झाले पाहिजे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, अखिल आगरी समाज परिषदेचे हे महाअधिवेशन आगरी समाजातील तरुण पिढीच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच फलदायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ना. चव्हाण यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी या वेळी म्हणाले की, अशा पद्धतीने आगरी समाजाचे अधिवेशन होणे ही खरी गरज आहे. नवीन विमानतळ होत आहे. दर वाढत आहेत. जागेची योग्य किंमत मिळाली पाहिजे. शासनाने दर योग्य ते सांगितले पाहिजेत. अधिवेशनाचा फायदा समाजासाठी होतो. समाजाची एकजूट असेल तर प्रश्न मार्गी लागतात. मोठय़ा प्रकल्पांना आगरी समाजाने जमिनी दिल्या आहेत. आगरी समाज जनहितासाठी काम करणारा आहे. शिवाजीचे मावळे म्हणजे आगरी होय. कूळकायदा आगरी समाजाने निर्माण केला. लहान उद्योजकांना येथे वक्ते म्हणूून बोलवा, म्हणजे उद्योगधंद्यांचे महत्त्व वाढेल. तरुण उद्योजक पुढे येईल. नोकरी निर्माण करणारी शक्ती निर्माण करण्यासाठी एकजूट करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. या अधिवेशनात माजी मंत्री लीलाधर डाके, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, खासदार सुरेश टावरे, आमदार प्रशांत ठाकूर, मधुकर ठाकूर, सीताराम भोईर, योगेश पाटील, चंद्रकांत मोकळ आदी उपस्थित होते.
 सकाळी महिला कबड्डी स्पर्धा पनवेल नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या हस्ते पार पडल्या. दोन दिवस सुरू असणाऱ्या महाअधिवेशनात परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा