जनतेच्या हितासाठी आवश्यक असणारे सर्व मुद्दे राज्यसभेत मांडलेल्या जनलोकपाल विधेयकात असल्याने आपण समाधानी आहोत, मात्र ज्यांना कुणाला हे विधेयक मान्य नसेल त्यांनी उर्वरित मुद्दय़ांसाठी स्वतंत्रपणे आंदोलन करावे असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता लगावला.
राज्यसभेत सरकारने मांडलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या मसुदयावर हजारे यांनी शनिवारी समाधान व्यक्त केल्यानंतर ‘आप’चे केजरीवाल, कुमार विश्वास व प्रशांत भूषण यांनी हे विधेयक सक्षम नसल्याचे सांगत हजारे हे सत्ताधाऱ्यांना शरण गेले आहेत, तसेच त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांची दिशाभूल करीत आहेत असे सांगत विधेयकाला विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर ‘आप’च्या मुद्दय़ांचे हजारे यांनी रविवारी खंडन केले.  दरम्यान, राज्यसभेत मांडलेल्या विधेयकामुळे उंदीरदेखील तुरुंगात जाणार नसल्याचे केजरीवाल यांच्या वक्तव्याचा समाचार माजी सनदी अधिकारी किरण बेदी यांनी घेतला. या विधेयकातील मसुद्याचा आम्ही अभ्यास केला असून विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर उंदीरच काय वाघदेखील तुरुंगात जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.      
“दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणाच्यावेळी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात जनतेची सनद, प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील अधिकारी व कर्मचारी लोकपालच्या कक्षेत घेणे व प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी केली होती. यापैकी दोन मुद्यांचा समावेश विधेयकाच्या मसुद्यात आहे.”
अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

Story img Loader