शेतकरी संघटना ऊठसूठ बारामतीला येऊन, आंदोलन करायचे, यावर मुख्यमंत्री कराडचे आहेत. कराडात जाऊन आंदोलन करा असे आम्ही सांगत असताना, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या दारातच आंदोलन अन् जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करणारे आता, केंद्रीय कृषिमंत्री बिहारचे आहेत. म्हणून बिहारला जाऊन आंदोलने करणार का? असा संतप्त सवाल आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. केंद्र शासनाने अडचणीतील साखर कारखान्यांना अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
कराड तालुक्यातील शिवनगर येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ५५ वा गळीत हंगाम शुभारंभ व कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते होते. ‘कृष्णा’चे उपाध्यक्ष सुरेश पाटील, कार्यकारी संचालक अशोक नलवडे, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, की साखरेसह इथेनॉलसारख्या इतर उत्पादनांना चांगल्या प्रतीचा भाव मिळाला, तरच उसाला योग्य दर मिळू शकतो. गत सहा महिन्यांत निर्यात कमी व आयात जादा झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा भाव कमी झाल्यामुळे अडचणीत असणाऱ्या कारखानदारीला बळ देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वाढीव ऊसदर देण्यासाठी केंद्र शासनाने अनुदान म्हणून मदत करावी.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आम्हाला आहे. सत्ता कालावधीत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, परंतु काम करणाऱ्यांच्याकडून चुका होतातच. काम न करणाऱ्यांच्याकडून चुका कशा होतील. उसाचा दर वाढवून मिळवा म्हणून आमची सत्ता होती तेव्हा कारखाने सुरू होण्यापूर्वीच शेतकरी संघटना आंदोलने करत होती. आता हेच शेतकऱ्यांची बाजू घेणारे लोक वेळ पडली तर आम्ही आंदोलने करू, अशी भाषा करीत आहेत. सरकार बदललं सरकारमधील माणसं बदलली की स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनांमधील माणसं बदलली असल्याची टीका त्यांनी केली.
अविनाश मोहिते म्हणाले, की कार्यक्षेत्रातील ऊस लवकरात लवकर गाळप करणार आहे. दोन वर्षांपासून गेटकेनचा ऊस पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे तोडणी, वाहतूक खर्च पहिल्या दहा कारखान्यामध्ये आपल्या कृष्णा कारखान्याचा नंबर आहे. तसेच कारखान्याशी संबंधित कृषी महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट कोटय़ामध्ये फक्त सभासदांच्याच मुलांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा