सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी उद्यापासून (मंगळवार) असहकार आंदोलन करणार आहेत. मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हय़ातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी उद्याच सामूहिक राजीनामेही देणार आहेत. डॉक्टरांच्या ‘मॅग्मो’ या संघटनेचे विभागीय सचिव डॉ. सचिन देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये राज्यात सुमारे १२ हजार वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांचे अनेक प्रश्न आजपर्यंत प्रलंबित आहेत. सातत्याने पाठपुरावा करून व अनेकदा चर्चा करूनही केवळ आश्वासनांशिवाय ‘मॅग्मो’ला सरकारकडून काहीच मिळाले नाही. गेल्या २ जूनला मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्यांची १० दिवसांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे सरकारच्या आवाहनानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले होते. परंतु २० जूनपर्यंतही सरकारकडून मागण्यांसंदर्भात विचार झाला नसल्याने ‘मॅग्मो’ने पुन्हा बेमुदत कामबंद असहकार आंदोलनाचा बडगा उगारला आहे. यात जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा व कुष्ठरोग कार्यालये, साथरोग नियंत्रण कक्ष, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालये आदी ठिकाणच्या बाहय़रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, इमरजन्सी तसेच पोस्टमार्टेम, साथरोगविषयक कामकाज, आरोग्यविषयक सर्व राष्ट्रीय कार्यक्रम तसेच सर्व प्रकारच्या शासकीय बठकांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.
‘मॅग्मो’चे राज्य अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड व सरचिटणीस डॉ. प्रमोद राक्षमवार प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आझाद मदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहेत. आरोग्यविषयक होणाऱ्या सर्व परिणामांना राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा विभागीय सचिव डॉ. सचिन देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कानडे, सचिव डॉ. अभिजित बागल यांनी पत्रकाद्वारे दिला.

Story img Loader