ऊसदराच्या प्रश्नावरील तीव्र आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता दुष्काळी भागातील पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन जाहीर केले आहे. ‘संघर्ष पाण्याचा, पंचनामा भ्रष्टाचाराचा’ या शीर्षकाखालील हे आंदोलन आर. आर. आबांच्या तासगाव तालुक्यातून १३ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दुष्काळाच्या प्रश्नावर ठोस निर्णय होणार नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील, असेही खोत यांनी स्पष्ट केले.
खोत म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आली पाहिजे. दुष्काळी भागासाठी केंद्राने राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग स्थापन केला पाहिजे. त्यातून दुष्काळी भागांना स्वतंत्र निधी मिळू शकेल. याबाबत राज्य शासनाने शिफरस करावी. सिंचनाच्या कामांतून भ्रष्टाचाराची एक नवी संधी मिळते आहे. सरकारने सिंचनाच्या चौकशीची समिती जाहीर केली. मात्र, आजवर अनेक समित्या स्थापन झाल्या. त्यातून खरा गुन्हेगार शोधला किंवा अहवालानुसार एखाद्याला शिक्षा झाली, असे कधी झाले नाही. तत्कालीन वादळ शांत करण्यासाठीच या समित्या असतात. श्वेतपत्रिकेतून डोंगर पोखरून उंदीर काढला, त्यामुळे या समितीतूनही काही होणार नाही. सिंचनाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला कणखर भूमिका घेत दहा वर्षांत ०.१ टक्के सिंचन झाल्याने म्हटले होते. मात्र, तीन महिन्यांनंतर काय जादू झाली माहीत नाही. सिंचन ०.१ वरून ५.७ टक्क्य़ांवर गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही सुरुवातीला हा राजकीय डाव टाकला होता, हे आता स्पष्ट झाले आहे.
सिंचन प्रकल्पाबाबत ते म्हणाले, मुख्य प्रकल्प पूर्ण नसताना मते मिळविण्यासाठी कालव्यांची कामे केली. सरकारी पैसा निवडणुकांसाठी वापरण्याची ही शक्कल राष्ट्रवादी काँग्रेसने वापरली. अधिकारी, ठेकेदारांच्या भ्रष्टारचार व पाणी पाळविण्याच्या प्रकारांमुळे दुष्काळी भागातील लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ‘संघर्ष पाण्याचा, पंचनामा भ्रष्टाचाराचा’ हे आंदोलन सुरू करणार आहोत. तासगाव तालुक्यातील मांजर्डी गावातून १३ जानेवारीला हे आंदोलन सुरू होऊन एकाच वेळी सर्व जिल्ह्य़ांमध्ये हे आंदोलन होणार आहे. आर. आर. आबांनी एकेकाळी पाण्यासाठी मेळावे घेतले. ते दुष्काळी भागातील नेतृत्व आहेत. आता आबांना हा प्रश्न का दिसत नाही?    
‘मावळ गोळीबारप्रकरणी पुन्हा रस्त्यावर उतरणार’
मावळ गोळीबार प्रकरणी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, मावळ गोळीबार प्रकरणी नेमलेल्या आयोगाची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर आहे. १५ जानेवारीपूर्वी त्याबाबत काही निर्णय न घेतल्यास मावळात पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्या प्रश्नी राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्रित आणून आंदोलन केले जाईल.

Story img Loader