सांगली : बागायती शेती उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
विधानसभा निवडणुकीदरम्यान शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तथापि, सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाला सांगलीपर्यंत विरोध नसल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध लक्षात घेऊन फेर रेखांकन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्यातील १९ गावे महामार्गाने बाधित होत असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा – मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्याची हालचाल सुरू
हेही वाचा – शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट
शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने पुन्हा याविरुद्ध आंदोलन सुरू केले असून कोल्हापूर रस्त्यावर अंकली फाटा येथे रस्ता रोखण्यात आला. चार दिवसांपूर्वी मणेराजुरी (ता.तासगाव) येथेही शेतकऱ्यांनी आंदोलन करत महामार्गाला विरोध दर्शवला. काल आंदोलनात उमेश देशमुख, शंभोराज काटकर, सतीश साखळकर, महेश खराडे, विराज बुटाला, गिरीश पवार, प्रकाश पाटील, के. डी. पाटील आदींसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी सहभागी झाले होते.