गुणवत्ता व स्पर्धेत सरस ठरूनही नांदेडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून डावलण्याचे कुटील राजकारण खेळले गेले. मुख्यमंत्री मराठवाडय़ाच्या हक्काचे उपक्रम नागपूरला हिरावून नेत आहेत. त्यांची ही भूमिका पक्षपाती असून, स्मार्ट सिटी योजनेत निवडलेल्या शहरांचा येत्या १५ दिवसांत पुनर्विचार करून नांदेडचा त्यात समावेश करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने लोकशीही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार अमरनाथ राजूरकर यांनी दिला.
‘स्मार्ट सिटी’साठी राज्यातील १० महानगरांची निवड मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. त्यात नांदेडचा समावेश नाही. नांदेडमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेसतर्फे या दृष्टीने फेरविचारासाठी सरकारला निवेदन देण्यात आले. त्यानंतर महापौर शैलजा स्वामी यांच्या दालनात पत्रकार बैठक घेण्यात आली. माजी मंत्री डी. पी. सावंत, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष आमदार राजूरकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, उपमहापौर शफी अहमद कुरेशी, किशोर स्वामी, प्रा. ललिता शिंदे, विजय येवनकर, संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, की स्मार्ट सिटी योजनेत समावेशासाठी केंद्राने स्पर्धात्मक पद्धत अवलंबली. त्यात नांदेड महापालिकेने आवश्यक मुद्यांच्या निकषाला अनुसरून प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नांदेडला ९२.५ टक्के गुणांकन प्राप्त झाले. तरीही डावलण्यात आले. नांदेड महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे, हे एकच कारण असेल तर नांदेडकरांवर हा अन्याय आहे. एकीकडे स्पर्धात्मक म्हणायचे आणि राजकीय हेतू बाळगत मनमानी करायची ही कुठली पद्धत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आमदार राजूरकर यांनी फडणवीस सरकारच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. महसूल आयुक्तालयाबाबत टाळाटाळ सुरू असून, ‘स्मार्ट सिटी’बाबत तीच आकसाची भूमिका दिसून येत असल्याच्या मुद्यावरही राजूरकर यांनी जोर दिला. स्वत:वरील संकट टाळण्यासाठी ज्यांनी भाजपत उद्या घेतल्या, त्यांना आपल्या सरकारवर नांदेडच्या हितासाठी दबाव आणण्याची गरज वाटली नसेलही; परंतु शहर सर्वाचे असून येत्या १५ दिवसांत ‘स्मार्ट सिटी’मध्ये नांदेडच्या समावेशाबाबत पुनर्विचार व्हावा. त्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार आहोत, परंतु त्यानंतरही ‘नांदेड बंद’चीही तयारी असल्याचे राजूरकर यांनी स्पष्ट केले. आंदोलनात काँग्रेसेतर पक्ष, संघटनांच्या सहभागाबद्दल विचारले असता शहराच्या हितासाठी जे जे बरोबर येतील, त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष कदम यांनीही भाजप जिल्हाध्यक्षांवर सडकून टीका केली.
‘सरकारमधील मित्रपक्षाचे अपयश’
पात्रता व गुणवत्ता असतानाही स्मार्ट सिटी योजनेत नांदेडला डावलणे, हे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या मित्रपक्षांचेही अपयश असल्याचे राजूरकर म्हणाले. जिल्हय़ात शिवसेनेचे ४ आमदार आहेत. त्यांनी नांदेडच्या समावेशासाठी आक्रमक भूमिक घेणे अभिप्रेत होते, परंतु त्यांनी तसे केले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader