शासकीय वनजमिनीवरील संघटित अतिक्रमण आंदोलनाचे लोण अकोले तालुक्यातही पोहोचले असून तालुक्यातील पिसेवाडी, धामणगाव पाट, पाडाळणे येथील वनजमिनीवर आंदोलकांनी नांगरट करून अतिक्रमण केले आहे. गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून सुरू असणाऱ्या या आंदोलनाबाबत प्रशासन विशेष गंभीर असल्याचे दिसत नाही. आंदोलक प्रचंड आक्रमक तर स्थानिक प्रशासन गोंधळलेले आणि हतबल अशी स्थिती असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील पिसेवाडी, पिंपळगाव खांड व पाडाळणे येथील वनक्षेत्रात मागील पंधरा दिवसांत टप्प्याटप्प्याने आदिवासींकडून अतिक्रमण करण्यात आले. अतिक्रमणाची ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. या अतिक्रमणात वनक्षेत्रातील झाडे तोडून ठिकठिकाणी आंदोलकांनी नांगरट केली आहे. धामणगाव पाट येथे सुमारे तीन ते साडेतीन हेक्टर, पिसेवाडीत सात हेक्टर ते पाडाळणे येथेही तीन साडेतीन हेक्टर क्षेत्रावर याप्रकारे नांगरट करण्यात आली. पिंपळगाव खांड, पिसेवाडी येथे याच वर्षी केलेली बांबूची रोपे उपटून फेकून दिली. पाडाळणेच्या डोंगरावर ५५ हेक्टर वनक्षेत्र असून त्यात खैर, शिवन, बेहडा यांसारखी झाडे आहेत. तेथेही दोन तीन ठिकाणी गवत कापून नांगरट करण्यात आली. डोंगराच्या माथ्यावर ५२ कोप्याही उभारण्यात आल्या आहेत. त्यासाठीही तेथीलच तोडलेल्या झाडांचा उपयोग करण्यात आल्या. पिसेवाडीतही अशाच प्रकारच्या ५० कोप्या आंदोलकांनी उभारल्या आहेत. तेथे याचवर्षी लागवड केलेली बांबूची झाडे तोडण्यात आली. तर पिंपळगाव खांड येथे सात वर्षांपूर्वी लागवड केलेल्या वनक्षेत्रातील वनौषधांची झाडे तोडण्यात आली. आठशे हजारच्या संख्येने येणारे आंदोलक लाठय़ा, काठय़ा, कोयते, कुऱ्हाडी, विळे, गलोर आदी हत्यारांसह बरोबर मिरचीची पुड घेऊनही आलेले असतात. अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना दमदाटी केली जाते. जमिनीवरील गवत कापल्यानंतर लोखंडी नांगराने जमीन नांगरून काढण्यात येते. नांगर ओढण्याचे हे काम पंधरावीस माणसेच करीत असतात. पिंपळगाव खांड येथे ग्रामस्थांनी अतिक्रमणास विरोध केला परंतु त्याला आंदोलकांनी जुमानले नाही. उलट आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य जखमी झाला. २० सप्टेंबरला पिसेवाडीत, २९ ला पाडाळणे येथे आणि १ ऑक्टोबरपासून धामणगाव पाटला अतिक्रमण आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाबाबत प्रशासन विशेष गंभीर असल्याचे दिसत नाही. पोलीस, वनविभाग, महसूल खाते कारवाईची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपासून प्रशासनाने प्रथमच या आंदोलनाची काही प्रमाणात दखल घेतली असून वनखात्याच्या पांगरी येथील रोपवाटीकेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र आज तेथे पोलीस आणि वनाधिकारी उपस्थित असताना तेथून दोनतीनशे मीटर अंतरावर आंदोलक वनक्षेत्रात नांगरट करण्यात मग्न होते. पोलीस कारवाई करत नसल्याची वनाधिकाऱ्यांची तक्रार आहे तर हे गुन्हे वनकायद्यान्वये दाखल झालेले असल्याचे कारवाईचे अधिकार त्याच खात्याला असल्याचे तसेच कारवाईबाबत वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे. एरवी वनक्षेत्रात चार शेळ्या घुसल्या तर कारवाईची धमकी देणारे वनकर्मचारी या आंदोलनाकडे हतबलतेने पाहत असल्याचे दिसून येत आहे. िपपळगाव खांडचा अपवाद वगळता या दोन गावातील ग्रामस्थांनाही अतिक्रमणाबाबत विशेष स्वारस्य असल्याचे दिसून आले नाही. एरवी कुठे दोन चार झाडे तुटली तर गाजावाजा करणारे पर्यावरणवादीही या घटनेबाबत तसे मुग गिळूनच आहेत. गर्दणी, उंचखडक, निंब्रळ, कोतुळ, बोरी, पाडाळणे, पिसेवाडी आदी गावातील हे आंदोलक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भविष्यात अन्य गावांमध्येही अतिक्रमणाचे हे लोण पसरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा