कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यात कराड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत करार झाला. हा मार्ग १०४ कि.मी. लांबीचा आहे. यात दहा रेल्वे स्थानके तसेच १९ बोगदे आहेत. कुंभार्ली बोगदा सर्वाधिक लांबीचा आहे. खेरडी, मुंढे, कोयना रोड, येराड, पाटण, नाडे, मल्हार पेठ, साकुर्डी आणि कराड असे थांबे असतील. खर्चापकी कंपनीचा वाटा ७४ टक्के तर राज्य आणि केंद्राचा वाटा २६ टक्के असा आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडले जाणार आहे.
मध्य कोकण पश्चिम महाराष्ट्राला आणि विशेषत: सातारा जिल्ह्य़ाला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या नवीन १०४ कि.मी. लोहमार्ग निर्माण करण्याच्या योजनेला संबंधितांमध्ये जरूर ते करार साक्षांकित झाले. या करारनियोजनानुसार विहित वेळेत, कालापव्यय न होता कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काम जास्तीत जास्त वेगाने आणि दर्जेदारपणे मार्गी लावण्याबाबत आम्ही स्वत लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पुणे ते मिरज डबल ट्रक सुविधेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासन, केंद्र शासन आणि रेल्वे कंपनी यांच्या त्रिस्तरीय करारपत्रावर स्वाक्षरी करण्याचा समारंभ पार पडल्यावर, याबाबत माहिती देताना खासदार भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात नमूद केले आहे की, कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वेने जोडण्याबाबत सर्वप्रथम आम्ही मागणी केली. कराड चिपळूण हा रेल्वे मार्गच अन्य रेल्वे मार्गापेक्षा अधिक सोयीचा असल्याने, याबाबत आम्ही तत्कालीन रेल्वेमंत्री, तसेच राज्याने राज्याचा वाटा अंदाजपत्रकात तरतूद करून उचलावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी असलेला व्यक्तिगत जिव्हाळा, सातत्याचा पाठपुरावा, रेल्वे बोर्डाचे वेळोवेळी मिळालेले सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न यामुळे हे शक्य झाले. लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होण्याबाबत आम्ही कटाक्षाने लक्ष पुरवणार आहोत, त्यामुळे नजिकच्या काळात पाटण, कराड आणि सातारा जिल्ह्य़ासह पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार उदिमास आणि प्रवाशांना अधिक चांगली रेल्वेसुविधा उपलब्ध होईल. या कराराच्या स्वाक्षरींच्या निमित्ताने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पुणे ते मिरज डबल ट्रक सुविधेबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुणे-मिरज दुहेरी लोहमार्ग तसेच या मार्गावरील वीज इंजिन वाहतूक कार्यान्वित करणे ही कामे प्राधान्याने होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.