लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील नऊ पैकी पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर चार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी २८ आणि ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. यात अलिबाग, पेण, कर्जत आणि मुरुड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ९ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक लागली होती. यापैकी महाड, रोहा, खालापूर, माणगाव, पनवेल या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १८ जांगासाठी १८ अर्ज आल्याने या पाचही कृषी उत्पन्न बाजार समित्या बिनविरोध झाल्या आहेत.
मात्र अलिबाग, पेण, कर्जत आणि मुरुड या चार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जास्त अर्ज आल्याने तिथे निवडणूक होणार आहे. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यात सहकारी संस्थाच्या मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी अडते मतदार संघातून २ तर हमाल मापारी मतदार संघातून १ सदस्यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी जास्त नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत. तिथे निवडणूक होणार आहे. अलिबाग येथे २३, पेण ३८, कर्जत २५ आणि मुरुड येथे २३ जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या चार ठिकाणी घटक निहाय उमेदवारांच्या संख्येनुसार निवडणूक होणार आहे.
आणखी वाचा- खोपोली बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना अद्याप मदत नाही
या पुर्वी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका फारशा चर्चेत नसायच्या. बहुतेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हायची. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसचे या बाजार समित्यांवर एकहाती वर्चस्व असायचे. यंदा मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपने या निवडणूका लाढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी आवश्यक मोर्चेबांधणी केली आहे. अलिबाग, मुरुड मध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी, पेण मध्ये माजी आमदार आणि भाजप नेते धैर्यशील पाटील यांनी निवडणूकीत लक्ष्य घातले आहे. त्यामुळे कित्त्येक वर्षाच्या बाजार समित्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेकापच्या वर्चस्वाला धक्के लागणार का हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
अलिबाग तालुक्यातील २८ तारखेला मतदान होणार असून २९ तारखेला सायंकाळी मतमोजणी होणार आहे. तर पेण, मुरुड आणि कर्जत येथे ३० तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.