आसाराम लोमटे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाग ४

परभणी : पारंपरिक बियाण्यापासून सुरू झालेला प्रवास संकरित, संशोधित बियाण्यांपर्यंत जाऊन पोहोचला. मात्र, याच प्रवासादरम्यान बियाणे बाजारात चोरवाटा वाढल्या. बियाणांच्या भरमसाट किंमतीबाबतही मक्तेदारी प्रतिबंधक व उचित व्यापारासंबंधी कायदा आहे. नकली वा बनावट बियाणे रोखण्यासाठी यंत्रणेची मोठी साखळी आहे. तरीही सर्व यंत्रणा ऐन हंगामात निष्प्रभ का ठरते, हा कळीचा प्रश्न आहे.

निवडक कणसे काढून ती वाळविणे, गोमूत्र लावून गाडग्या-मडक्यात बियाणे सांभाळणे, कडुनिबांच्या पाल्याचा लेप लावणे या पद्धतीने पूर्वी बियाणे जतन केले जायचे. बियाणे राखण्याचे कौशल्य बाळगलेल्या शेतकऱ्याकडे पेरणीच्या काळात बियाणासाठी रिघ लागायची. सत्तरच्या दशकापर्यंत ही परिस्थिती होती. १९८० च्या सुमारास बाजारात संकरित बियाणांचा प्रवेश झाला. बियाणे जतन करण्याची परंपरागत पद्धत जवळपास लोप पावली. त्यातूनच पुढे संकरित संशोधित बियाणापर्यंतचा प्रवास सुरू झाला जो   जैविक बियाण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. बियाणातील या क्रांतीचा उत्पादन वाढीसाठी निश्चितच  फायदा झाला. संकरित बियाणाचा वापर वाढल्यानंतर काही ठराविक वाणांचा कृत्रिम तुटवडा, त्यातून काळाबाजार आणि बियाणातील खोट या बाबी नित्याच्याच झाल्या. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा उठवून  काही दिवसांत लाखो रुपये उकळणारे महाभाग या क्षेत्रात तयार झाले. आजही बियाणे क्षेत्रात काही नामांकित कंपन्या असल्या तरी पावसाळय़ातील छत्रीप्रमाणे उगवणाऱ्या काही कंपन्या असतात.

बहुतांश शेतकरी शेतमाल पिकवतात, तर काही शेतकरी बिजोत्पादन करतात. यात अधिक पैसा मिळतो. बिजोत्पादकाकडून कंपन्या बियाणे खरेदी करतात. बीज प्रक्रिया केंद्रावर हे बियाणे आणले जाते. प्रयोगशाळेतील चाचणीनंतर कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर या बियाणाची खातरजमा केली जाते. बिजोत्पादकाकडून बियाणे आल्यानंतर त्यातील  निकृष्ठ प्रतीचे बियाणे ‘ग्रॅव्हिटी सेपरेटर’ यंत्राद्वारे वेगळे केले जाते. सर्व प्रकारच्या चाचण्यानंतर बियाणे कंपन्या त्यांच्या सोयीनुसार ‘लॉट नंबर’ देतात.

कापूस बियाणे तंतूविरहीत करण्यासाठी अ‍ॅसिडची प्रक्रिया केली जाते. यात योग्य प्रमाणात अ‍ॅसिडचा वापर झाला नाही तर त्याचा बियाणे उगवणशक्तीवर मोठा परिणाम होतो. त्यानंतर या बियाणाची अंकुरण क्षमता, प्राकृतिक शुद्धता तपासली जाते. अनुवांशिक शुद्धता तपासण्यासाठी मात्र वेळ लागतो. बियाणे पेरल्यानंतर झाड फुलावर येईपर्यंत अनुवांशिक शुद्धता तपासली जाऊ शकत नाही. बियाणाच्या पाकीटावर ज्या गोष्टी लिहिल्या जातात त्याची पडताळणी लगेच येऊ शकत नाही. बियाणे उगवण्याची ताकद कमी झाल्यास तक्रारी वाढतात. अलिकडे बियाणांच्या किंमतीही प्रचंड वाढ झाली. साठा तपासणे, अभिलेख तपासणे, संशयास्पद साठय़ाची विक्री थांबविणे, मालाच्या नोंदी विहीत नमुन्यात असल्याची खातरजमा करणे या बाबी कृषी कर्मचाऱ्यांच्या अखत्यारित येतात. तरीही बनावट बियाणांच्या तक्रारीत  वाढ होत आहे. अर्थात प्रत्येक बियाणे हे बाजारातून विकतच घेतले पाहिजे, या विचारामुळे  दोन दशकांत बियाणे बाजार वाढतच गेला आणि त्यात अपप्रवृत्ती शिरल्या. काही बियाणे शेतकरी  घरचेही वापरू शकतात, याचा त्यांना विसर पडला. त्यातूनच  भेसळ करणाऱ्यांचे फावले.

सोयाबीनचे बियाणे घरचेच

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणांचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. दोन वर्षांत पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे  पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. स्वत: उत्पादित केलेले मागील वर्षीचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याकरिता त्याची उगवणशक्ती तपासणे अत्यंत गरजेचे असून, त्यावरून चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू  शकते. उगवणक्षमतेनुसार पेरणीसाठी बियाण्यांचे प्रमाण ठरवता येते. त्यानुसार मातीमध्ये उगवणक्षमता तपासणे, कुंडीत बियाणे तपासणे आदींसह अन्य काही माध्यमातून उत्पादकता लक्षात येते. शेतकरी स्वत:कडील बियाण्याची उगवणक्षमता बीज परीक्षण प्रयोगशाळेत करू शकतात. त्यासाठी चाळीस रुपये प्रती चाचणी याप्रमाणे दर आकारला जातो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural system is ineffective due to seeds adulteration zws
Show comments