अलिबाग : रस्ते आणि जलमार्गाने दक्षिण मुंबईशी जोडला गेल्याने रायगड जिल्ह्याची वाटचाल तिसऱ्या मुंबईच्या दिशेने सुरू झाली आहे. जिल्ह्यात औद्याोगिकीकरणाला चालना मिळाल्याने आर्थिक सुबत्ता आली आहे. अशातच मुद्रा कर्ज वितरण गेल्या काही वर्षात जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. आदिवासीबहूल भागातली बालकांचे कुपोषण रोखण्यात यश मिळू लागले आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रायगडची कामगिरी यंदाही वरचढ ठरली आहे.
रायगड जिल्हा हा पूर्वी कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जायचा, भात शेती आणि मत्स्यव्यवसाय हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. मात्र जिल्ह्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन राज्य सरकारने रायगडला औद्याोगिक जिल्ह्याचा दर्जा बहाल केला, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. शेतीकडून उद्याोगाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. जेएनपीटी पाठोपाठ, दिघी आगरदांडा येथे व्यापारी बंदर विकसित होत आहे. धरमतर खाडीतही बंदराच्या विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा संख्यांकी विभागाच्या २०२४ औद्याोगिक पाहणी अहवालानुसार जिल्ह्यात कार्यरत कारखान्यांची संख्या १ हजार ७३५ असून, यात कार्यरत कामगारांची संख्या १ लाख ९५ हजार ३६३ इतकी आहे. घरगुती दरडोई विजेचा वापर ४९६ किलोवॉट आहे. तर औद्याोगिक विजेचा दरडोई वापर २ हजार ८०८ किलोवॉट आहे. दर लाख लोकसंख्येच्या मागे सरासरी वाहनांची संख्या ४१ हजार ७५६ इतकी आहे. रायगडमध्ये रस्ते उभारणीलाही चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न ८३ हजार ९५३ राज्याच्या उत्पन्नात जिल्ह्याचा वाटा २.६४ टक्के आहे.
मुद्रा योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार या आर्थिक वर्षात ६६८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी ६६२ कोटीच्या कर्जांचे वितरण झाले आहे. यात शिशु गटात १४९ कोटी, किशोर गटात ३०९, तरुण गटात २१० कोटींच्या कर्ज वितरणाचा समावेश आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत मुद्रा कर्ज वितरणात रायगड जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. मुद्रा कर्ज वितरणात गेल्या सहा वर्षात जिल्ह्याचा आलेख कायम चढता राहिला आहे.
कुपोषणावर मात करण्यात यश
जिल्ह्यातील सात तालुके हे आदिवासी बहूल तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात पूर्वी कुपोषित मुले आढळून येण्याचे प्रमाण लक्षणीय होते. मात्र गेल्या वर्षभरात महिला व बाल विकास विभागाकडून कुपोषण रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले गेले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण ०.५ टक्के असून, मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण २.२ टक्केपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे कुपोषणमुळे बालकांचे मृत्यू रोखण्यात यश आले आहे.
शासकीय पातळीवर चांगले काम करून, कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा, ज्यामुळे त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य स्तर उंचवावा हे आमचे प्रयत्न सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत. यापुढील काळात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
आकडेवारी काय सांगते?
जिल्ह्याप्रति लाख लोकसंख्येमागे शाळांची संख्या १२२ आहे. माध्यमिक विभागात इयत्ता ९ वी आणि दहावीत गळतीचे प्रमाण ३.२ टक्के, तर उच्च माध्यमिक विभागात ११ वी १२ वी गळतीचे प्रमाण ४ टक्के आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गळतीचे प्रमाण कमी आहे. रायगड जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत प्रती लाख बँकांची संख्या १६.९ आहे. कर्ज व ठेवींचे प्रमाण ६३.८ टक्के आहे.