‘गेल्या आठ वर्षांपासून कंटूर पद्धतीची शेती करीत आहे, जमिनीची धूप थांबली आहे, उत्पादनही वाढले आहे. खारपाणपट्टय़ासाठी ही पद्धत वरदानच ठरू पाहतेय.’ दर्यापूर तालुक्यातील नरदोडा गावचे विलास टाले सांगत होते. या भागातील शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे यांनी सुरू केलेल्या कंटूर शेतीच्या प्रयोगाला आता लोकमान्यता मिळू लागली आहे. कृषी विद्यापीठानेही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. भूगर्भातील खाऱ्या पाण्याच्या शापाला कंटूर शेतीचा उ:शाप मिळाला आहे. ‘कंटूर पद्धतीमुळे शेतात पाणी जिरलेच. शिवाय, मृदसंधारणही व्यवस्थित झाले आहे. यंदा चांगला पाऊस होऊनही माती वाहून गेली नाही. शेततळ्यातील गाळ दर दोन-तीन वर्षांनी शेतात टाकतो. जमीन कसदार बनत चालली आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तरी उत्पादन कमी होत नाही. शेवटी शेतकऱ्यांना काय हवे, चांगले उत्पादन आणि बाजारात चांगला दर..’ विलास टाले यांचा अनुभव बोलका आहे. त्याला प्रात्यक्षिकाची जोड आहे.

दर्यापूर तालुक्यातील ७० ते ७५ गावांमधील शेतकरी कंटूर पद्धतीच्या शेतीकडे वळले. त्यांच्या आयुष्यातील अस्थिरता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. पश्चिम विदर्भातील सुमारे ४ लाख हेक्टरवर पसरलेल्या पूर्णा खोऱ्यातील टापू खारपाणपट्टा (सलाईन ट्रॅक) म्हणून ओळखला जातो. मुळात पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने खारवटलेली जमीन आणि भूगर्भातील खारे पाणी ही या भागाची खरी समस्या आहे. सुपीक अशी काळीशार जमीन असूनही पाटाच्या पाण्यावर ओलिताची शेती करणे शक्य नाही. कमी उत्पादन आणि हवामानाचा वाढलेला जोखीमस्तर यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दुष्टचक्र आहे. शेतकऱ्यांना कमी पावसातही चांगल्या उत्पादनाची हमी देणाऱ्या या प्रयोगाची सकारात्मक चर्चा आता होऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी अरविंद नळकांडे यांनी त्यांच्या शेतात प्रयोग केले. जमिनीला पडणाऱ्या मोठय़ा भेगा ज्यांना स्थानिक भाषेत बुढय़ा म्हणतात, त्यांना न बुजवता, शेतात नांगरणी न करता कंटूर बांधांच्या माध्यमातून पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरवण्याचा त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली. २००९ मध्ये त्यांना ‘इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेजन’ या संस्थेने पुरस्कृत केले. अरविंद नळकांडे सांगतात, ‘या भागात उन्हाळ्यात जमिनीला मोठय़ा भेगा पडतात. पावसाळ्याआधी नांगरणी केल्यावर या भेगा बुजल्या जातात. मी या भेगा बुजवायच्याच नाहीत, असा निर्णय घेतला. ‘आत्मा’चे माजी प्रकल्प संचालक जे. सी. भुतडा यांचे मार्गदर्शन मिळाले. शेतजमिनीचा उतार पाहून कंटूर बांध काढले आणि त्यातून पावसाळ्यात जमिनीची धूप थांबवली. पावसाचे पाणी थेट या भेगांमधून जमिनीत मुरले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. शेतातील काडीकचरा पावसाच्या पाण्यासोबत या भेगांमधून आत शिरतो, त्यामुळे सेंद्रीय घटकही शेतजमिनीत सामावले गेले.’

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम

अरविंद नळकांडे सांगतात, ‘खरे तर या मोठय़ा भेगा उन्हाळ्यात फार महत्वाच्या असतात. सूर्यप्रकाश खोलवर जाऊन अपायकारक कीडींचे कोश मरतात, तर पावसाळ्यात या भेगांमधून पाणी थेट जमिनीत खोलवर जाते. त्यामुळे रब्बी हंगामात जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास मदत झाली. जमिनीचा पोतही सुधारला, पण या पद्धतीत शेतकऱ्यांना अर्ध रब्बी म्हणजे एकच पीक घेता येते. मला, उशिरा तूर पेरूनही चांगले उत्पादन मिळाले. तूर उशिरा पेरल्यावर लोकांनी मला मुर्खात काढले होते, पण चांगले उत्पादन घेऊन मी माझ्या प्रयोगाची सिद्धता केली.’ बुढय़ा तशाच ठेवा, असा अरविंद नळकांडे यांचा आग्रह नाही. ‘केवळ कंटूर बांधबंदिस्ती केली, बुढय़ा बुजवल्या, तर खरीप आणि रब्बी ही दोन्ही पिके घेता येतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कंटूर बांध प्रकाराला प्रोत्साहन दिले आहे. बुढय़ा तशाच ठेवा, असे आमचे म्हणणे नाही, पण एक पीक घेऊनही चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते, हे मात्र निश्चित.’ असे नळकांडे सांगतात. काही वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली खारपाणपट्टय़ातील ८३ गावांमध्ये मृद आणि जलसंधारणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यात कंटूर पद्धतीचे मृद आणि जलसंधारण, शेततळे, पाणी व्यवस्थापन, जलपुनर्भरण आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रभावी वापर करण्यात आला. बुढय़ा आणि कंटूर पद्धतीच्या शेतीचा प्रसार होण्याची गरज अनेक शेती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास खर्चे यांच्या मते, ‘खारपाणपट्टय़ात जमिनीत सोडिअमचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे निचरा मंदावतो. कंटूर बांधांमुळे या भागात चांगले फायदे दिसून आले आहेत. जमिनीची धूप थांबण्यास त्यामुळे मदत होते. या भागात कमी कालावधीत जास्त पाऊस होतो, त्यामुळे सुपीक माती वाहून जाते. ती वाहून जाऊ नये यासाठी आणि भूजल पुनर्भरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने अनेक प्रयोग राबवले जात आहेत. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने खारपाणपट्टय़ात एक प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यातूनही या भागातील प्रश्न सोडवण्यास मदत होऊ शकेल.’

आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत या भागातील शेतीचा विकास करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक बँकेच्या आणि कृषी विभागाच्या पथकाने खारपाणपट्टय़ातील गावांची पाहणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून खारपाणपट्टय़ाचा कायापालट होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारी पातळीवरील उपाययोजनांपेक्षा स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या दैनंदिन प्रयोगातून, त्यांच्यातील क्रियाशीलता वाढवून मिळणारे अनुभव हे अधिक उपयोगी ठरू लागले आहे. कंटूर पद्धतीने जलसंधारणाची एक दिशा या भागाला दिली आहे.