वाडा तालुक्यात सुरूअसलेल्या दगडखाणी तसेच येथील स्टोन क्रशर कंपनीमुळे होत असलेल्या  प्रदुषणामुळे येथील शेती धोक्यात आली असून शासनाने  ही कंपनी त्वरीत बंद करावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. संबधीत शेतकऱ्यांकडून अलिकडेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
वाडा तालुक्यात कचांड, शेल्टे आणि वोवघर या तीन गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टोन क्रशर कंपनी मार्फत दगडापासून वाळू तसेच खडी तयार करण्याचे काम केले जाते. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू आहे. येथील शेतकरी भाजीपाला, फळशेती, रेशीम शेती यांचे उत्पादन घेतात.
सध्या क्रशर कंपनीमधून निघणाऱ्या धुरामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या पीकांचे नुकसात होत आहे. तसेच कंपनीमधून सोडण्यात येणाऱ्या प्रदुषित पाण्याचा शेतजमिनींमध्ये शिरकाव होत असल्याने येथे मोठय़ा प्रमाणावर गाळ साचून पीकांचे नुकसान होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी या परिसरातील शेतकरी नारायण ठाकरे यांच्या शेतावर रेशीम शेतीच्या लागवडीचे उद्घाटन करुन तालुक्यात रेशीम शेतीला सुरुवात करुन दिली होती. आज व्यवसाय जम पकडत असतानाच या क्रशर कंपनी मार्फत होणाऱ्या प्रदुषणामूळे रेशीम शेती संपुष्टात येत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
याबाबत वाडय़ाचे तहसिलदार दिलीप संखे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत कंपनीच्या मालकास नोटीस पाठविण्यात आली असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.