कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली. धारणी तालुक्यातील सादराबाडी येथे सत्तार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला. विशेष म्हणजे त्यांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच भेटीगाठींना सुरुवात केली. तसेच गावातील विविध नागरिकांच्या भेटी घेत त्यांचे प्रश्न समजून घेतले.
अब्दुल सत्तार यांचे बुधवारी (३१ ऑगस्ट) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास साद्राबाडी येथे आगमन झाले. त्यांनी गावातील शैलेंद्र सावलकर या शेतकरी बांधवाच्या घरी मुक्काम केला. आगमनानंतर त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी विविध विषयांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे गुरुवारी (१ सप्टेंबर) पहाटे पाच वाजल्यापासूनच शेतकरी सावरकर आणि इतर शेतकरी बांधवांशी चर्चा करून शेतीविषयक अडचणी, आवश्यक उपाययोजना याची माहिती घेतली. सत्तारांनी गावातील प्रत्येक घराला भेट देऊन गावकरी बांधवांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
हेही वाचा : सांगली : अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्या – स्वतंत्र भारत पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कृषिमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच या उपक्रमाची माहिती देत शेतकरी आत्महत्या का करतो याची कारणे शोधण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. काही नवीन धोरणात्मक नियम करता येतील का याबाबत हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मेळघाटसह आजूबाजूच्या भागात १०० टक्के नुकसान पंचनामे झाले आहेत, असा दावा सत्तारांनी केला.