अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ढाल-तलवार या चिन्हाला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. या चिन्हाबाबतच्या शंकांचं निरसन निवडणूक आयोग करेल, असे सांगतानाच सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर मशालीवरून टीकास्र डागलं आहे. “आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली. दुसऱ्यांना आग लावण्यासाठी मशालही मिळाली”, असा खोचक टोला सत्तार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
शिंदे गटाची ढाल ईडीची आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकाराने सत्तार यांना विचारला. “आमची ढाल छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. स्वराज्यातील जनतेला आणि गडकिल्ल्यांना महाराजांनी ढाल-तलवारीनेच संरक्षण दिलं होतं. ही ढाल-तलवार ईडीची असू शकत नाही. त्यावेळी ईडी नव्हती”, असं प्रत्युत्तर सत्तार यांनी दिले आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत कोण विजयी होणार हे जनता ठरवेल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास या निवडणुकीच्या प्रचारात उतरेल, असे सत्तार यांनी सांगितले आहे. बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाला युतीची ऑफर दिली आहे. यावर “प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंचं हिंदूत्व मान्य असेल, तर पुढच्या निवडणुकीसाठी त्यांचं काहीतरी नियोजन असेल”, असे सत्तार म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंचं हिंदूत्व मान्य कसं झालं? याबाबत तज्ज्ञांनी चिंतन करायला पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे. सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राहतील, असे सत्तार यांनी म्हटले आहे.