राज्यातील राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह आज गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटातील दिग्गज नेते गुवाहाटीला रवाना झाले आहेत. मात्र, या दौऱ्यातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अनुपस्थितीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सत्तार नाराज असल्यानं त्यांनी गुवाहाटीला जाणं टाळलं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांना पूर्णविराम देत कृषीमंत्र्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे.
आपण कोणावरही नाराज नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. कृषीप्रदर्शन असल्यानं गुवाहाटीला जाता आलं नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. “मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. त्यांना शेतकरी, गोरगरिबांसाठी कळवळा आहे. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास वाढू लागला आहे”, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणावरुन राज्यात घमासान पाहायला मिळालं होतं. सत्तार यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका करण्य़ात आली होती.
“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना गुवाहाटी दौऱ्याचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. “कामाख्या देवीच्या आशीर्वादाने राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं आहे. या देवीवर आमची श्रद्धा आहे. म्हणून दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. राज्यातल्या जनतेला सुखी करण्याचं साकडं कामाख्या देवीकडे घालणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी जवळपास पाच ते सहा आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे हे आमदार येत नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.