राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज(सोमवार) सिल्लोड येथे जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री आणि शिवसेना(ठाकरे गट) नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सत्ता गेल्यानंतर यांना बांधावर जाण्याची आठवण होऊ लागली आहे, असं ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे आज सिल्लोड येथे आले होते, त्यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि ओला दुष्काळाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत. यावरून सत्तारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
भाषणात अब्दुल सत्तार म्हणाले, “काही लोक केवळ फोटो काढण्यासाठीच आपल्या तालुक्यात येत आहेत. आले तरी अंधारात आले, आता अंधरात काय पाहीलं असेल, किती पाहीलं असेल याबाबत मला काही बोलता येणार नाही. ज्यावेळी तुम्ही सत्तेवर होते तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. तुमचे वडील जे आमचेही नेते होते, तेही या राज्यात मुख्यमंत्री असताना त्यांनी जेवढा निधी दिला नाही, त्यापेक्षा तीनपटीने निधी देण्यासाठी आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार कुठेही कमी पडलं नाही. परंतु हे जे आता बांधावर येत आहेत, सत्ता गेल्यानंतर यांना बांध कळू लागला. सत्ता गेल्यानंतर यांना बांधावर जाण्याची आठवण होऊ लागली.”
याचबरोबर “या सर्व गोष्टी पाहिल्या तर मी तुम्हाला सांगतोय, की हे सरकार हे गरिबाला मदत करणारं सरकार आहे. या सरकारने सर्व शेतकरी, मजूर, गरिबांची दिवाळी साजरी व्हावी यासाठी चार पदार्थ देण्याचं पुण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे.” असंही सत्तार यांनी सांगितले.
हेही वाचा – PHOTOS : राजू शेट्टींच्या नेतृत्वात ‘स्वाभिमानी’चा पुण्यातील साखर संकुलावर धडक मोर्चा
याशिवाय, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जर कोणी अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही. यासाठी सर्वांना मैदानात उतरावं लागेल.” असंही सत्तार यांनी यावेळी म्हटलं.